कास पठार बहरले; रंगीबेरंगी रानफुलांची उधळण

jawali
jawali

कास (जि. सातारा) ः गेल्या सहा- सात दिवसांपासून मोसमी पावसाने उघडीप दिली असल्याने ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कास पठारवरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांना बहर येऊ लागला असून, फुलांची पठारवर उधळण पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पर्यटनबंदी कायम असल्याने कास पठार पर्यटकांविना प्रथमच ओस पडल्याचे दिसते. 

दर वर्षी कास पठारवरील रंगीबेरंगी रानफुलांच्या बहराला सप्टेंबर महिन्यात मोठा बहर येतो. त्याचप्रमाणे याही वर्षी मोसमी पावसाने सात दिवसांपासून उघडीप दिल्याने पठारवरील रानफुले बहरू लागल्याने सर्वत्र रंगीबेरंगी फुलांचे गालिचे पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी फुलांची चादर तयार झाल्याचे दिसून येत असून, पठार वर गुलाबी तेरड्याला मोठा बहर आला आहे. गेंद सीतेची आसवे, चवर, रानहळद, कापरू, आम्री, सोनकी, रानगवार, निलिमा आदी विविध वनस्पतींच्या फुलांना बहर आला असून, रंगीबेरंगी फुलांचा पठाराला अनोखा साज चढल्याचे दिसून येत आहे. 

या पुष्प पठारला आठ वर्षांपर्वी जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळाला. हे पठार नैसर्गिक अनमोल ठेव्याच्या जोरावर जगातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या पठारवरील रानफुलांच्या हंगामा काळात दर वर्षी देशविदेशातील लाखो पर्यटक कास पठारला भेट देतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांविना कास पठार फुलांनी बहरून गेल्याचे पाहायला मिळत आहे. 


पठारवरील फुलांना बहर येऊ लागला असून, येत्या आठ, दहा दिवसांत फुलांचा मोठा बहर येऊन सर्वत्र फुलांची चादर पाहायला मिळेल. 

- योगेश काळे, वन समिती कर्मचारी 

पठारवर पांढऱ्या, निळ्या, गुलाबी, लाल पिवळ्या आदी विविध रंगी लहान- मोठ्या फुलांना बहर आला असून, पठारावर फुलांचा अनोखा साज पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पर्यटकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत कास पठारावर येऊ नये. फुलांचा हंगाम आपण पुढील वर्षीही पाहू शकतो. 

- अभिषेक शेलार, वन समिती कर्मचारी 

संपादन ः संजय साळुंखे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com