जाणून घ्या... तब्बल 20 वर्षांनंतर कशी उगवली पिके जोमदार...

जगन्नाथ माळी
शनिवार, 4 जुलै 2020

सुमारे 20 वर्षांनंतर पारंपरिक निसर्गचक्राप्रमाणे पाऊस पडल्याने व खरीप हंगाम पारंपरिक पद्धतीने सुरू होऊन पिके जोमदार उगवल्याने शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

उंडाळे (जि. सातारा) : पूर्वीपासून विभागांमध्ये मे महिन्यामध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण व्हायच्या. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला प्रारंभ व्हायचा आणि उन्हाळाभर राबून शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाची चीज व्हायचे. पिकाची उगवण उत्तम प्रकारे व्हायची आणि हंगामी यशस्वी व्हायचा. निसर्ग आणि त्याचे हे चक्र प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू होते. मात्र, सुमारे वीस वर्षांपासून या चक्रामध्ये बदल होत राहिल्याने शेतीचे सर्व वेळापत्रक कोलमडले. 

यावर्षी मात्र प्राचीन निसर्ग चक्राप्रमाणे सर्व गोष्टी घडत गेल्याने अगदी बरोबर वेळेवर पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येळगाव विभागात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच धूळवाफेवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिके जोमाने उगवली असून, दोनदा शेतकऱ्यांनी कोळपणी केली आहे. या परिसरातील पीक जोरदार आले आहे, तर उंडाळे विभागातील, ओंड, नांदगाव, साळशिरंबे, मनू, सवादे टाळगाव, जिंती परिसरात मे महिन्यामध्ये शेताची मशागत करून शेतामध्ये खत टाकून आडसाली लागणीसाठी सऱ्या पाडून त्यामध्ये तीन फुटी, साडेचार फूट सरी पडली आहे. त्यामध्ये आडसाली ऊस लागणी केल्या असून, जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सरीवर भुईमूग व सोयाबीनची टोकणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी सरी न पाडता मोकळ्या शेतात बैल व ट्रॅक्‍टरच्या साह्याने पेरणी केली आहे. सध्या टोकणीची कामे पूर्ण झाली असून, आडसाली लागणीतील कामे अंतिम टप्प्यात आहेत.

पाऊस वेळेवर आल्याने पेरणी, टोकणी झाली. डोंगरी भागात पिके तोऱ्यात असून, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब मोहिते म्हणाले, ""निसर्गचक्राप्रमाणे या वर्षी मॉन्सून दाखल झाला. त्याचा फायदा झाला असून, सोयाबीन, भुईमूगाची उगवण चांगली झाली आहे. वेळेवर पेरणी झाल्यामुळे उत्पन्न सुद्धा चांगले निघेल.'' 

महिला कोरोना फायटर्सची मानसिक छळवणूक; जिल्हा रुग्णालयात खदखद

जा कोरोना जा...चा संदेश, जावळीत भात खाचरात तरव्याच्या साह्याने प्रयत्न​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Kharif Crops Thrive On The Traditional Cycle Of Nature