esakal | Satara: पावसाने पिकांची हानी; झेंडू बागांचे अतोनात नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

झेंडू बागांचे अतोनात नुकसान

खटाव : पावसाने पिकांची हानी; झेंडू बागांचे अतोनात नुकसान

sakal_logo
By
केशव कचरे

बुध : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, सततच्या पावसामुळे भाजीपाल्याची पिके शेतातच सडू लागली आहेत. डिस्कळ, वेटणे, रणसिंगवाडी, करंजओढा, नागनाथवाडी परिसरात आगाप लागवड केलेल्या कांद्याचे व रोपांचे सततच्या पावसाने व रोज पडणाऱ्या दव, धुक्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसासोबत वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुसेगाव, नेर, फडतरवाडी, काटेवाडी परिसरातील टोमॅटो, वांगी, काकडी आदी भाजीपाल्यांच्या पिकांसह कारल्याचे मांडव व या परिसरातील उसाचे पीक भुईसपाट झाले आहे. काटेवाडी, बुध, करंजओढा परिसरातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनाही पावसाने मोठा दणका दिला असून, तोडणीस आलेल्या झेंडूच्या बागा ठिकठिकाणी कोलमडून पडल्याचे चित्र काटेवाडी परिसरात दिसून येत आहे.

हेही वाचा: पिंपरी : शहरातील १७२ शाळांची संच मान्यतेची अपूर्ण माहिती

हातातोंडाशी आलेले झेंडूचे पीक मातीमोल झाल्याने झेंडू उत्पादक शेतकरी प्रचंड तणावाखाली आला आहे. गेले दोन महिने मोठ्या कष्टाने सांभाळलेल्या झेंडूच्या बागांचे दसरा अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे. सणासुदीच्या दिवसात झेंडू पिकापासून मोठे उत्पन्न मिळण्याची आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, सततच्या पावसाने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटात लोटले आहे.

loading image
go to top