Satara News: वाईत रविवारपासून कृष्णामाई उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara News

Satara News: वाईत रविवारपासून कृष्णामाई उत्सव

वाई : येथील श्री कृष्णामाईच्या पारंपरिक उत्सवास येत्या रविवारपासून भीमकुंड आळीतील उत्सवाने प्रारंभ होत आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा उत्सव लोकवर्गणीतून साजरा केला जातो.

कृष्णातीरावरील सात घाटांवर एकापाठोपाठ एक याप्रमाणे सुमारे दीड महिना हा उत्सव साजरा होतो. प्रत्येक घाटावर चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

भीमकुंड आळी ऊर्फ भीमाशंकर संस्थान घाट उत्सवाची सुरुवात रविवारी (ता. २२) सकाळी आठ वाजता उदकशांत त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ‘श्रीं’च्या मिरवणुकीने होणार आहे. या वेळी पालखीतून ‘श्रीं’ची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होणार आहे.

पाच दिवसांच्या या उत्सवात सोमवारी (ता. २३) दुपारी तीन वाजता मंत्रजागर, चार वाजता मैत्रयी ग्रुप यांचे ‘श्रीसुक्त पठण’, पाच वाजता महिला मंडळ यांचा मंत्रजागर, रात्री साडेनऊ वाजता हभप निरंजन महाराज मनमाडकर यांचा स्कंदमहापुराणातील कृष्णा माहात्म्यातील कृष्णामाईचा महिमा सांगणारा श्री कृष्णा माहात्म्यम हा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवारी (ता. २४) सकाळी ९ ते ११ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे. पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी व पाचवी ते सातवी अशा तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

दुपारी ११ वाजता बक्षीस समारंभ, दुपारी चार वाजता गार्गी भजनी मंडळ, धर्मपुरी यांचे भजन, पाच वाजता वीरशैव महिला मंडळाचे श्रीसूक्त पठण, रात्री साडेनऊ वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला संबळ वादक गौरी रायचळ- वनारसे यांचा संबळ वादन त्यानंतर रात्री साडेदहा वाजता अशर्व ज्ञानेश्वर बोत्रे यांचे बासरी वादनाचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवारी (ता. २५) सकाळी ११ ते ३ आळीकर व निमंत्रितांसाठी महाप्रसाद, रात्री साडेनऊ वाजता मैथिली बापट व कौशिकी अजय जोगळेकर (पुणे) यांचे गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

गुरुवारी (ता. २६) दुपारी चार वाजता कृष्णाई भजनी मंडळ गंगापुरी यांचे भजन सायंकाळी पाच वाजता संस्थानचे हळदी- कुंकू व साडी लिलाव, रात्री साडेनऊ वाजता कौस्तुभ वैद्य यांचे लळिताचे कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.

याशिवाय दररोज सकाळी साडेपाच वाजता माऊली मंडळ यांची काकड आरती, रोज सायंकाळी सात वाजता महाआरती, मंत्रपुष्प, तसेच त्यानंतर आळीतील महिलांचे श्री. विष्णुसहस्रनाम पठण होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व कार्याध्यक्ष उमेश रास्ते यांनी दिली.

त्यानंतर मधलीआळी (ता. २६ जानेवारी), धर्मपुरी (ता. ३१ जानेवारी), गणपती आळी (ता. ६ फेब्रुवारी), ब्राह्मणशाही (ता. १२ फेब्रुवारी), रामडोहआळी (ता. २१ फेब्रुवारी), गंगापुरी (२५ फेब्रुवारी) या घाटावर श्री. कृष्णामाई उत्सव होणार आहेत.