पाऊस आला की चुकतोय काळजाचा ठोका, जमीन खचणारी गावे उपायांविनाच!

कृष्णत साळुंखे
रविवार, 12 जुलै 2020

वर्षाच्या नुकसानीवर शासनाने काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, मुख्य उपाययोजना केलेल्या नाहीत. "रामभरोसे'च सोडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 
 

चाफळ (जि. सातारा) : गतवर्षाच्या मुसळधार पावसाने विभागात नुकसान झाले होते. विभागातील डोंगरकपारीतील वाड्यावस्त्यांचा काळजाचा ठोका चुकला होता. दहा ते 12 किलोमीटर खोल जमीन खचली, तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली होती. मागील वर्षाचा अंदाज घेऊन वर्षभरामध्ये त्यावर उपाय होतील, अशी भाबडी अपेक्षा डोंगरदऱ्यांतील गावांना होती. मात्र, ती साफ चुकीची ठरली आहे. यंदा पावसाळा सुरू झाला आहे तरीही डोंगरदऱ्यांतील गावांत काही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यात डोंगरकपारीतल बाटेवाडी गावही त्या सुविधांपासून वंचित राहिले आहे. 

यावर्षी चाफळ विभागातील ऊत्तर-मांड धरणाच्या पाणलोट परिसरात पाऊस सुरू झाला आहे अन्‌ गतवर्षीच्या मुसळधार पावसाळ्याचे चित्र डोळ्यासमोर आले. विभागातील गावांचा ठोका चुकत होता. काही डोंगरच घसरले, जमीन खचली, घरांची पडझड झाली होती, दरडही कोसळली होती, काही ठिकाणी पिकांसह जमीनच वाहून गेली होती. अशा अनेक घटनांनी मालिका चाफळ विभागाने मागील वर्षी झेलली होती. त्या सगळ्यांवर शासन वर्षभरात मात करेल, अशी भाबडी समजूत डोंगरकपारीतील गावांची होती. मात्र, काही सुविधा याही वर्षी पुरविल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा पावसाळा सुरू झाल्याने डोंगरकपारीतील गावांची पुरती झोप उडाली आहे.

मागील वर्षाच्या घटना डोळ्यासमोर तरळू लागलेल्या आहेत. मागील वर्षाच्या नुकसानीवर शासनाने काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, मुख्य उपाययोजना केलेल्या नाहीत. "रामभरोसे'च सोडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ झाली असून, शासनाने येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करावे, ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. 

बाटेवाडीचे माळीण करणार का? 

चाफळच्या पश्‍चिमेस केळोलीलगतच्या डोंगरकपारीत दुर्गम भागात वसलेले बाटेवाडी हे 26 उंबरा अन्‌ 300 लोकसंख्येचे गाव. तेथे 13 वर्षांपूर्वी डोंगर घसरला. तेव्हा दोन घरे डोंगरासोबत चार फूट सरकली. मात्र, जीवितहानी झाली नाही. तेव्हापासून गावावर दरड कोसळ्याची टांगती तलवार आहे. पावसाळा आला की, ग्रामस्थ जीव मुठीत धरून बसतात. हमखास पावसाळ्यात प्रत्येक घरात पाणी शिरतेच. डोंगर घसरण्याच्या घटनेपासून बाटेवाडीच्या पुनर्वसनाची निव्वळ चर्चा रंगते आहे. शासनाच्या भूजल, भूवैज्ञानिक विभागाने गाव कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे सुचविलेले आहे. मात्र, 13 वर्षांत निव्वळ प्रस्तावांचा कागदी खेळ होतो आहे. आजपर्यंत पुनर्वसन होऊ शकलेले नाही, ही शोकांतिका मानावी लागेल. बाटेवाडीचे माळीण झाल्यावरच शासनाला जाग येणार का, अशी शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 

""बाटेवाडी, मसुगडेवाडी, भैरेवाडी कुटुंबांसाठी सुरक्षित ठिकाणी तात्पुरती निवाराशेड उभारण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. पाडळोशी, मसुगडेवाडी व बाटेवाडी येथे तात्पुरत्या निवाराशेडची उभारणी केली जाईल. तेथे संबंधित कुटुंबांचे स्थलांतर होणार आहे.'' 
-शंभूराज देसाई, 
गृहराज्यमंत्री 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Land Consuming Villages Without Solutions!