मारुल हवेली परिसरात बिबट्याची दहशत

विलास माने
Thursday, 17 September 2020

पाटण तालुक्‍यातील मारुल हवेली येथील नागरिकांना सातत्याने बिबट्याचे सतत दर्शन होत आहे. खाद्याच्या शोधात फिरणारा बिबट्या आता दिवसादेखील नरजेस पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

मल्हारपेठ ः गावठी कोंबड्यांच्या शिकारीसाठी बिबट्या फेऱ्या मारत असल्याने मारुल हवेली (ता. पाटण) येथील नागरिकांना त्याचे सतत दर्शन होत आहे. खाद्याच्या शोधात फिरणारा बिबट्या आता दिवसादेखील नरजेस पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

मारुल हवेली विभागात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून कायम आहे. खाद्याच्या शोधात भटकणाऱ्या तीन बिबट्यांचे दर्शन वारंवार होऊ लागले आहे. काल (ता. 13) सकाळी सहा वाजता मारुल हवेली येथील दिवशी रस्त्याच्या बाजूच्या एका घरातून बिबट्याने कोंबडी पळवली. त्यानंतर पुन्हा आठ वाजता बिबट्या त्याठिकाणी आल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. आरडाओरड करून त्यास धुडकावून लावल्यानंतर काही वेळानंतर आकरा नावाच्या परिसरात तो पुन्हा दिसून आला. याठिकाणी तीन बिबट्या असल्याचे पाहणाऱ्या नागरिकांकडून सांगितले जात आहे. येथील भरळी, माळ, गणेशनगर भागात त्यांचे सारखे दर्शन होत आहे. उसाच्या शेतात बिबट्या लपून बसत असल्याने शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे. 

दिवसेंदिवस बिबट्याचा लोकवस्तीतील शिरकाव वाढत आहे. त्यामुळे महिला व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. पहाटे, दुपारच्या वेळी, सायंकाळी अथवा रात्रीच्या सुमारास कधीही बिबट्या नजरेस पडत आहे. काही वेळेला बिबट्या रस्त्यावरून वाहनधारकांना आडवा जात आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कायम होत असताना वन विभाग मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. 

संपादन ः संजय साळुंखे 

 

साताऱ्यातील जम्बो हॉस्पिटलवर शुक्लकाष्ठ 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Leopard terror in Marul Haveli area