Satara : जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ‘प्रोत्साहन’ अडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

Satara : जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ‘प्रोत्साहन’ अडकले

सातारा : वेळेत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शिंदे- फडणवीस सरकारने ५० हजारांचे अनुदान वाटप सुरू केले आहे; पण पात्र शेतकऱ्यांच्या यादीत कर्जमाफीत बसलेले शेतकरी व शासकीय नोकरांचा समावेश झाल्याने ही यादी पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचे अनुदान अडकले आहे. येत्या आठवडाभरात या यादीची संपूर्ण तपासणी होऊनच दुसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर केली जाणार आहे.

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा समावेश झाला. या माध्यमातून जिल्ह्याला एकूण ८८० कोटी रुपये मिळणार आहेत. या अनुदानासाठी ८४ हजार १०८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली. बॅंक खाते आधार व मोबाईलशी लिंकअप असणाऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा होऊ लागल्या; पण अचानक ही प्रक्रिया थांबली.

या यादीत काही कर्जमाफीचा लाभ मिळणारे शेतकरी सापडले, तर काही शासकीय नोकरांचा समावेश झाला होता. यांची नावे आता वगळण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्या यादीसह उर्वरित सर्व याद्या पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्याची तपासणी होऊन पुढील आठवड्यात यातील पहिल्या यादीतील उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे. त्यानंतरच दुसरी यादी जाहीर होईल.

जिल्ह्याच्या यादीत फारशा त्रुटी नसल्या, तरी त्यामध्ये कर्जमाफीत बसलेले शेतकरी, तसेच शासकीय नोकरांचा समावेश झालेला आहे. काही खातेदार मृत असल्याने त्यांच्या आधार लिंकअप होऊ शकत नाही. या सर्वांवर पर्याय काढून पुढे प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ११ हजार शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यापैकी काही मृत, तर काहींची खाती बंद आहेत. त्याचा शोध घेऊन त्यावर उपाय काढला जाणार आहे. त्यासाठी याद्या तपासणीसाठी पाठविल्या आहेत.