माणदेशात आढळले महाराष्ट्र राज्य फुलपाखरू "निलवंत'

फिरोज तांबोळी 
Thursday, 1 October 2020

मखमली रंगाचे हे फुलपाखरू असून, त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. श्रीलंका, नेपाळ, भारतातील पश्‍चिम घाट, दक्षिण भारत व पूर्व समुद्रकिनारपट्टीवर हे फुलपाखरू आढळते.

गोंदवले (जि. सातारा) : सातत्याने जलसंधारण व मनसंधारणाची वाट चोखळताना किरकसालकरांनी निसर्गाशी नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. या प्रयत्नातूनच राज्य फुलपाखरू "निलवंत'ही प्रजाती माण तालुक्‍यातील किरकसालच्या खोऱ्यात शोधण्यात यश मिळाले आहे. वन्यजीव सप्ताहाच्या पूर्वसंध्येला यानिमित्ताने गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन समितीच्या माध्यमातून व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील युवकांनी परिसरात वन्यजीव नोंदी करण्याचे काम हाती घेतलेले आहे. आत्तापर्यंत परिसरामध्ये विविध 100 हून अधिक पशुपक्ष्यांच्या नव्याने नोंदी करण्यात आलेल्या आहेत. 

नुकतेच या "टीम'ला नळीच्या ओढ्याजवळ महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू समजले जाणारे ब्लू मॉर्मन (निलवंत) जातीचे फुलपाखरू आढळून आले. दक्षिण भारतात सर्वांत मोठ्या आकाराचे सदर्न बर्डविंग हे फुलपाखरू आढळते. या फुलपाखराच्या खालोखाल महाराष्ट्रात दिसणाऱ्या निलवंत या फुलपाखराचा आकार मोठा आहे. पावसाळ्यात कमी पावसाच्या प्रदेशात हे 
फुलपाखरू स्थलांतर करते. 

मखमली रंगाचे हे फुलपाखरू असून, त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. श्रीलंका, नेपाळ, भारतातील पश्‍चिम घाट, दक्षिण भारत व पूर्व समुद्रकिनारपट्टीवर हे फुलपाखरू आढळते. खाण्याचे लिंबू, माकड लिंबू, मेनका अशा वृक्षांच्या पानांवर या फुलपाखरांची मादी अंडी घालते. ही पाने खाऊन अळी मोठी होते व तिचे फुलपाखरात रूपांतर होते. जून 2015 मध्ये ब्लू मॉर्मन (निलवंत) हे महाराष्ट्रात राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात असल्याची माहिती अभ्यासक चिन्मय सावंत यांनी दिली. 

""वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून समाजोन्नती करणाऱ्या किरकसाल गावात निलवंत फुलपाखराची तालुक्‍यातील पहिली नोंद झाल्याने अभिमान वाटतो. या कामगिरीचे श्रेय गावातील होतकरू युवकांना जाते.'' 
-अमोल काटकर, अध्यक्ष, जैवविविधता संरक्षण व संवर्धन समिती, किरकसाल 

संपादन : पांडुरंग बर्गे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Maharashtra State Butterfly 'Nilwant' Found In Mandesha