esakal | लॉकडाउन "कडक'; पण रस्त्यांवर गर्दी! पेट्रोल, डिझेल विक्रीवर निर्बंधांची गरज

बोलून बातमी शोधा

Police
लॉकडाउन "कडक'; पण रस्त्यांवर गर्दी!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा (Coronavirus) वेग वाढल्याने जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउनचा (Lockdown) निर्णय घेतला आहे; पण पहिल्याच दिवशी त्याचा फज्जा उडाला आहे. दुकाने बंद असूनही दुचाकीवरून लोक रस्त्यावरच आल्याचे चित्र पाहायला मिळले. सातारा शहरातील दोनच चौकांत पोलिस तपासणी होत असल्याने उर्वरित शहरात प्रशासनाच्या निर्बंधांनाही लोक जुमानत नसल्याचे चित्र आहे. सर्व काही प्रशासनावर ढकलण्याऐवजी नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. (satara marathi news coronavirus lockdown implementation)

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित प्रमुख चार जिल्ह्यांत साताऱ्याचा समावेश आहे. जिल्ह्यात बाधितांचा वेग 40 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या व कमी पडणाऱ्या बेडची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात आजपासून लॉकडाउन आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी सर्व दुकाने बंद होती, तरीही नागरीक दुचाकीवरून रस्त्यावर आलेले दिसले. पोलिसांनी अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका उगारला. काहींची वाहनेही जप्त केली; पण पोलिसांची ही कारवाई सातारा शहरातील प्रमुख दोन रस्त्यांवरच झाली. शहरात येणाऱ्या रस्त्यांवरील प्रमुख चौकात मात्र, लोकांची गर्दी होती. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या कडक लॉकडाउनमध्ये रस्त्यावर एखादे वाहन व व्यक्ती पाहायला मिळत होती. पोलिसांनी चांगली नाकाबंदी केल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळाले होते; पण सध्या नागरिक बिनधास्त बाहेर येत आहेत. काहीही कारणे सांगून लोक दुचाकीवरून रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनाही दंडुका उगारावा लागत आहे. नागरिकांनी अत्यावश्‍यक परिस्थितीतच घराबाहेर पडावे, अन्यथा घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करायला हवे, तरच आपण कोरोनाला रोखू शकू.

पेट्रोल, डिझेल विक्रीवर निर्बंधांची गरज

मागील लॉकडाउनच्या वेळी पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्‍यक सुविधांशी संबंधित व्यक्तींच्या वाहनांनाच इंधन दिले जात होते. त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेल मिळत नसल्याने रस्त्यावर तुरळक वाहने पाहायला मिळत होती. यावेळेच्या लॉकडाउनमध्ये पेट्रोल पंपावर कोणालाही इंधन मिळत असल्याने वाहने घेऊन कोणीही विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल व डिझेल वितरणासाठीही नियमावली लागू केल्यास विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्यांवर चाप बसू शकेल.

कोरोना संसर्गाचा वेग 40 टक्‍क्‍यांवर

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बाधित सापडत आहेत. ग्रामीण भागात तर संपूर्ण कुटुंबेच बाधित आढळत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक औद्योगिक वसाहतीतील कामगारांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडील कोरोना बाधितांची उपलब्ध आकडेवारी पाहिली, तर संसर्गाचा वेग 40 टक्‍क्‍यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 5,066 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 2,059 जणांचा अहवाल बाधित आला आहे. चाचणी केलेल्यांमध्ये जवळपास निम्मे बाधित सापडत आहेत. यामध्ये खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केलेल्यामध्ये तर 50 टक्के बाधित आढळत आहेत. त्यातून कोरोना संसर्गाचा धोका वाढतच असल्याचे दिसते.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउनची अंमलबजावणी व्हावी यासाठी कऱ्हाड येथे पोलिस, पालिका व महसूल विभागाच्या पथकांनी कारवाई केली. पोलिसांनी जवळपास 11 ठिकाणी नाकाबंदी केली. शहरांतर्गत रस्तेही बंद केले होते. महत्त्वाच्या कारणासाठी येणाऱ्यांना कोल्हापूर नाक्‍यावरील एकच मार्ग खुला होता. विनाकारण फिरणाऱ्यांच्या 80 दुचाकी, पाच चारचाकी वाहने जप्त केली आहेत. पोलिसांनी सर्वच नाक्‍यावर चोख पोलिस बंदोबस्त होता. विनामास्कच्या 50 जणांवर कारवाई करत दंडाची आकारणी केली आहे.

कडक लॉकडाउनची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून सुरू केली. त्यात विनाकारण फिरण्यास मनाई केली आहे. त्याशिवाय दुकानेही बंद ठेवली आहेत. शहरात बाहेरून येणाऱ्यांची तपासणी सुरू आहे. शहरातील 11 वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली जात आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, शहरात कारणाशिवाय येऊ नये, असेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. शहरातील नाकाबंदी वेळी 87 दुचाकी, तर पाच चारचाकी वाहने जप्त केली आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी दिली. कोल्हापूर नाका, जुना कोयना पूल, कार्वे नाका, कृष्णा नाका, कृष्णा कॅनॉलसह शहरातील ठिकाणेही रस्ते बंद केले आहेत. शहरात फिरणारी वेगवेगळी पथके केली आहेत. ती पथके गस्त घालत आहे. कोल्हापूर नाक्‍यावरून येणाऱ्यांची वर्दळ वाढल्याने तेथे तपासणी सुरू आहे. विनाकारण येणाऱ्यांची वाहने जप्त केली जात आहेत. पोलिसांनी 200 वाहने जप्त केली आहे. एक उसाच्या रसाचे दुकान सील केले आहे. पोलिस, पालिका व महसूल विभागाचे पथक शहरात गस्त घालत आहे. शहरात येण्यासाठी कोल्हापूर नाक्‍यावरून एकच रस्ता आहे. त्या रस्त्यावरून शहरात येण्यासाठी सकाळी वाहनांची गर्दी झाली होती. त्यातच पोलिसांनी अचानक वाहनांची तपासणी मोहीम राबवली. त्यामुळे वाहनांची सुमारे अर्धा किलोमीटर लांब रांग लागली होती.

हेही वाचा: मराठा आरक्षण रद्द; राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

हेही वाचा: Bed, Ventilator अभावी मरताहेत माणसं; प्रशासन आणखी किती जणांचा बळी घेणार?