सातारा : साडेचार हजार वारकऱ्यांना साथीचे आजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

epidemic among

सातारा : साडेचार हजार वारकऱ्यांना साथीचे आजार

सातारा : संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुक्कामी आहे. उद्या (रविवार) पालखी बरडला विसावणार आहे. या पालखी सोहळ्यात आरोग्य विभागाने ४१ पथकांच्या माध्यमातून २३ हजार वारकऱ्यांची तपासणी केली आहे. या तपासणीत सहा कोविड रुग्ण, तर अतिसार, ताप यासारखे साथीच्या आजार असणारे साडेचार हजार वारकरी आढळले आहेत. या रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने उपचार करण्यात आले आहेत.

दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यंदा पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. पालखी सोहळ्याने २८ जून रोजी जिल्ह्यात प्रवेश केल्याने पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्याचे दिसून आले. हा सोहळा ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुक्कामी असून, चार जुलैला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यंदा वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली होती. या सोहळ्यात साथीच्या आजाराचे रुग्ण आढळले असून, आरोग्य विभागाने योग्य उपचार केले आहे.

लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या पालखीच्या मुक्कामी ठिकाणी व पालखी मार्गावर वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून वारकऱ्यांची तपासणी पथके ठेवण्यात आली होती, तसेच यंदा आरोग्य दूतांची नेमणूक केली असून, वारकऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने दुचाकीवरून फिरून उपचार केले जात आहेत. पालखी सोहळ्यात अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये भेसळयुक्त व दूषित पदार्थ मिळण्याची शक्यता असते. या पार्श्‍वभूमीवर हॉटेलची तपासणी करणारी पथके नेमण्यात आली होती. या काळात ३९१ हॉटेलची तपासणी करण्यात आली असून, दूषित पदार्थ आढळलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात २८ जून ते ३ जुलै या दरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने पालखी तळ लोणंद, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र, तरडगाव आरोग्य केंद्र, तरडगाव शाळा, काळज उपकेंद्र, सुरवडी, निंभोरे उपकेंद्र, वडजल, फलटण विमानतळ, विडणी उपकेंद्र, पिंप्रद, वाजेगाव व पालखी तळ बरड या १३ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रावर एकूण कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व बुस्टर डोस देण्यात येत असून, आतापर्यत एक हजारहून अधिक वारकऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

पालखी सोहळ्याच्या कालावधीत वारकऱ्यांना सुविधा पोचविण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर लसीकरण केंद्रेही उभारण्यात आली आहेत. पालखी सोहळ्यात प्रशासनही दक्ष असून, विविध पथकांच्या माध्यमातून वारकऱ्यांची तपासणी सुरू आहे.

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Satara Maulis Palkhi Ceremony Inspection Health Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraSakalwariwarkari