
सातारा : मायणी ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार
मायणी : येथील ग्रामपंचायतीत विविध करापोटी जमा केलेल्या रकमेत लाखो रुपयांचा अपहार झाला असून, आज झालेल्या चौकशीत चौकशी अधिकाऱ्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले, अशी माहिती माजी उपसरपंच दादासाहेब कचरे यांनी दिली.
येथील ग्रामपंचायतीने कर गोळा करून अनेकांना जमा पावत्या दिल्या. त्या पावत्या किर्दीला न नोंदवता परस्पर लाखो रुपयांचा अपहार केला, अशी तक्रार दादासाहेब कचरे यांनी पुराव्यासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची तातडीने दखल घेत सीईओंनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीसाठी माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली. आज ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारीबाबत चौकशी करण्यात आली. अपहार काळातील कार्यरत सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी टी. एस. खाडे, एस. टी. धायगुडे, एस. के. गाढवे, बी. डी. बोराटे व सध्याचे ग्रामसेवक डी. जी. मुलाणी यांच्यासह तक्रारदार दादासाहेब कचरे आणि सरपंच सचिन गुदगेही उपस्थित होते.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या पुराव्याची पंचायतीमधील रेकॉर्डवरून अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यावेळी मारुती दत्तात्रय माळी यांची चार हजार ९८४ रुपये, दत्तू तातोबा खैरमोडे यांची १६ हजार २५० रुपये, आनंदीबाई दत्तात्रय खैरमोडे यांची ५६ हजार ३०० रुपये, प्रा.विकास यशवंत कांबळे यांची दोन हजार ७ ५२ रुपये, निवृत्त प्रा.सदाशिव राजाराम खाडे यांची १८ हजार ५५८ रुपये अशा सुमारे एक लाख रुपयांच्या करपावत्या किर्दीशी जुळल्या नाहीत. दरम्यान, चौकशी अधिकाऱ्यांनी मागणी करूनही ग्रामपंचायतीत २१ व २२ नंबरची करसंकलन पावती पुस्तके मिळाली नाहीत. पावती पुस्तकांचे स्टॉक आणि रजिस्टरही ठेवण्यात आले नसल्याचे ग्रामसेवकांनी चौकशीत सांगितले.
दरम्यान, तत्कालीन करसंकलन कर्मचारी सूरज खांडेकर यांनी कर जमेच्या पावत्या दिल्याचे उपस्थित मालमत्ताधारकांच्या चौकशीतून स्पष्ट झाले. अशा प्रकारच्या शेकडो बोगस पावत्यांद्वारे लाखो रुपयांचा अपहार झाला असून, नागरिकांनी आपल्याजवळील कर भरलेल्या पावत्यांची खातरजमा करावी. खात्यावर पैसे जमा नसल्यास ते जमा करण्यास भाग पाडावे, असे आवाहन कचरे यांनी केले आहे.
दरम्यान, कर पावत्यांच्या माध्यमातून अपहार होत असल्याबाबतची तक्रार विरोधी गटाचे सदस्य विनोद पवार व रणजित माने यांनी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने चौकशी करण्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला जाईल.
-सर्जेराव पाटील, गटविकास अधिकारी, माण