...म्हणून मी उपमुख्यमंत्र्यांना भेटणार : आमदार शशिकांत शिंदे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा नगरपंचायतीच्या वतीने काेरेगाव येथे सत्कार करण्यात आला.

कोरेगाव : कोरेगाव शहराशी निगडित विविध विकास योजनांसाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे. त्याचबरोबर नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शहराच्या विकासाला येत्या दीड वर्षात गती देणार आहे, अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
 
विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा रेश्‍मा कोकरे, उपाध्यक्षा संगीता बर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी श्री. शिंदे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, नगरसेवक बाळासाहेब बाचल, मंदा बर्गे, रेश्‍मा जाधव, सुलोचना फडतरे, शोभा येवले, नितीन ओसवाल, नागेश कांबळे, सचिन बर्गे, महेंद्र पवार, मुख्याधिकारी अशोक कुंभार, किशोर बर्गे, संतोष कोकरे, महादेव जाधव, गणेश येवले, दीपक फडतरे उपस्थित होते.
 
आमदार शिंदे म्हणाले, ""कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य शहरांच्या तुलनेत कोरेगावमध्ये सर्वांनीच जागरूकपणे काम केले आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यामध्ये हे शहर यशस्वी झाले आहे. नगरपंचायतीची निवडणूक आपण वेगवेगळे लढलो. काही कारणास्तव शहराचा विकास झाला नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी थोड्या मतांनी माझा पराभव झाला. मात्र, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मला विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. कोरोनाच्या साथीमुळे माझा आपल्याशी लवकर संपर्क होऊ शकला नाही. आता या शहराच्या विकासाला येत्या दीड वर्षामध्ये गती देण्याचे माझे नियोजन आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहे. नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन कोरेगावशी निगडित विविध योजनांबाबत चर्चा करणार आहे.''
 
आमदार शिंदे यांचे नगरपंचायतीला नेहमीच सहकार्य लाभल्याचे नगराध्यक्षा कोकरे यांनी सांगितले. नगरसेविका अर्चना बर्गे म्हणाल्या, ""आमदार शशिकांत शिंदे यांनी दहा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. जलसंपदामंत्री, पालकमंत्री म्हणून उत्तम काम करून त्यांनी मतदारसंघाचा विकास केला आहे. दरम्यान, काही घडामोडी घडून गेल्या असल्या, तरी आमदार शिंदे व किरण बर्गे हे दोघेही कोरेगाव नगरपंचायतीमध्ये एकत्रितच राहतील.'' संजय पिसाळ यांचेही भाषण झाले. 

खाकी वर्दी धावली अन्‌ त्या चालू लागल्या!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara MLC Shashikant Shinde Visited Koregoan In Satara District