विदर्भात 'बदली' झाली म्हणजे अधिकाऱ्याला त्रास; गडकरींनी पाटलांना सागितलं 'कारण'!

Nitin Gadkari
Nitin Gadkariesakal

सातारा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज (27 मे) वाढदिवस (Nitin Gadkari 63rd Birthday) आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil), भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह जिल्ह्यातील नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार श्रीनिवास पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट (Facebook Post) करत त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा आढावा घेत गडकरींच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्षम, दूरदृष्टी असलेले, फार मोठ्या मनाचे आणि अतिशय साध्या सरळ स्वभावाचे नेते म्हणूनही त्यांचा फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख करत वाढदिनी शुभेच्छा दिल्या. (satara mp shriniwas patil wishes nitin gadkari on his birthday trending political news)

Summary

मंत्री गडकरी एवढ्या मोठ्या पदावर पोहोचून देखील त्यांच्यात असलेला साधेपणा त्यांनी सोडला नाही. ते अजूनही माझ्यासह अनेकांशी तसाच कौटुंबिक जिव्हाळा, संबंध जपत असल्याचे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी गडकरींच्या वाढदिनी व्यक्त केले.

खासदार पाटील पुढे म्हणतात, गडकरी साहेबांचा आणि माझा परिचय सन १९९६ सालापासूनचा. महाराष्ट्र राज्यात सत्ता बदल होऊन सन १९९५ साली युतीचे शासन आले होते. त्यावेळी मी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा आयुक्त व पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणचा अध्यक्ष होतो. राज्यात सत्ताबदल झाल्या-झाल्या माझी बदली नागपूर महसूल विभागाचा अतिरिक्त आयुक्त म्हणून झाली. तेथे जेमतेम सहा महिने होत असतानाच पुन्हा त्याठिकाणाहून बदली होऊन अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास, नाशिक येथे नेमणूक झाली. त्यानंतर पुन्हा सहा महिन्यात बदलीचे आदेश आले आणि नागपूर येथील नागपूर सुधार प्रन्यास संस्थेच्या अध्यक्षपदी बदली झाली. वर्षभरातील ही तिसरी बदली होती. मात्र, कधीही कुठलीही बदली तात्काळ स्वीकारायची, हे धोरण आयुष्यात स्वीकारले असल्याने मी तेथेही आठवडाभरात सेवेत रुजू झालो. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे बांधकाम मंत्री होते नितीन गडकरी साहेब. पदावर रुजू झाल्यानंतर एक-दोन दिवसात गडकरी साहेबांच्या भेटीसाठी मी वेळ मागितली. त्यांनी लगेच चहा घेण्यासाठी मला आपल्या घरी बोलवले.

त्या भेटीदरम्यान अगदी मनमोकळेपणाने ते म्हणाले, विदर्भामध्ये बदली झाली म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा बाजूला टाकण्यासाठी बदली करण्यात येते असे सर्वसामान्यपणे अधिकाऱ्यांमध्ये मत असते. परंतु, तुम्ही असे मानू नये. नागपूर सुधार प्रन्यास स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूरचे नियोजन व विकास करणारी महत्त्वपूर्ण संस्था आहे. ती संस्था सध्या आर्थिक अडचणीत असून डबघाईला आलेली आहे. ही संस्था वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी चांगल्या अधिकाऱ्याचा शोध मला होता आणि म्हणून मुद्दामहून मी सूचना देऊन तुम्हाला येते मागवून घेतले आहे. तुम्ही प्रयत्न करून ही संस्था वाचवली पाहिजे. त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य व सहकार्य राहिल. तुम्ही पिंपरी-चिंचवड प्राधिकरणामध्ये केलेले काम मी पाहिलेले आहे. त्याच पद्धतीने आपण काम करावे अशी माझी इच्छा असल्याचे प्रांजळपणे बोलून माझ्या कामाप्रती असणारा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे तीन वर्षे त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मला पूर्ण स्वातंत्र्य दिले. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत त्यांचे मला सहकार्य मिळाले. तर काही काळ नागपूर सुधार प्रन्यास अध्यक्षपदासोबतच नागपूर महानगरपालिका आयुक्त पदाचा चार्ज देखील माझ्याकडे सुपूर्द केला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९९६ ते १९९९ या काळात नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे होऊ शकली.

Nitin Gadkari
हजाराच्या घोषणेची अंमलबजावणी कधी?; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंवर निशाणा

रस्ते, उद्याने, विविध नागरी सुविधा नव्याने निर्माण करता आल्या आणि त्यानंतरही नागपूर सुधार प्रन्यासची आर्थिक स्थिती खूप सुधारली, संस्था भक्कम झाली. यामध्ये मा. गडकरी साहेबांनी दिलेले सहकार्य, स्वातंत्र्य व प्रोत्साहन याचा फार मोठा वाटा होता. सन १९९९ साली माझ्या प्रशासकीय सेवेची अजून तीन वर्षे बाकी असताना आदरणीय शरद पवार साहेबांच्या सूचनेनुसार मी सनदी नोकरीचा राजीनामा देऊन स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतरही गडकरी साहेबांनी अतिशय मोठ्या मनाने नागपूर येथील महाल परिसरातील आपल्या घरी बोलवून माझा सहपत्नीक सत्कार केला. याशिवाय नागपूर शहरातर्फे जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करून पुढील कार्यासाठी मला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याकाळात नागपूरचा कायापालट करण्यासाठी गडकरींनी मला प्रोत्साहित केले होतेच, तसेच महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना त्यांनी एक्सप्रेस हायवे, बांद्रा-वरळी सी लिंक, मुंबईतील ५२ उड्डाणपूल असे नाविन्यपूर्ण आणि दूरगामी परिणाम होणारे प्रकल्प राबवून नागरिकांची मने जिंकली. आजही देशाचे रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नव्या संकल्पना राबवून ते रोज नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर पोहोचून देखील त्यांच्यातील असलेला अतिशय साधे सरळपणा त्यांनी सोडलेला नाही. ते अजूनही माझ्यासह अनेकांशी तसाच कौटुंबिक जिव्हाळा, संबंध जपत आहेत. महाराष्ट्राच्या या कर्तबगार सुपुत्राचा सर्वांनाच अभिमान आहे. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच यानिमित्ताने सदिच्छा!

satara-mp-shriniwas-patil-wishes-nitin-gadkari-on-his-birthday-trending-political-news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com