सातारा : महाबळेश्‍वरात बहुमजली वाहनतळ बांधणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहुमजली पार्किंगची मोठी गरज

सातारा : महाबळेश्‍वरात बहुमजली वाहनतळ बांधणार

महाबळेश्वर: नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील एसटी आगाराच्या जागी बहुमजली वाहनतळ बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालिकेला केल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. या वाहनतळाच्या बांधकामासाठी १७ कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाकडून पालिकेला मिळणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

महाबळेश्वरला दर वर्षी साधारण २० लाख पर्यटक भेट देतात. सलग सुट्यांमध्ये, तसेच विविध हंगामांत येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे महाबळेश्वर शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर, त्याचप्रमाणे शहरात वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी येथील रे गार्डन परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ बांधले आहे; परंतु हे वाहनतळ अपुरे पडत आहे. सध्या पालिकेने शहरातील बाजारपेठेच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. व्यापाऱ्यांना पुरेशा वाहनतळाची सोय प्रथम करा, असा आग्रह धरल्याने पालिकेने येथील एसटी आगारावर बहुमजली वाहनतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.

हा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी पालिका व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील आगार व बस स्थानकाच्या जागेची पाहणी केली. या वेळी सातारा विभाग नियंत्रक सागर पळसुळे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे, बांधकाम विभागाच्या श्रीमती काशीद, पालिकेचे प्रणव सस्ते, सचिन दीक्षित हे उपस्थित होते. पाहणीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘सध्या पालिकेचे रे गार्डन येथे वाहनतळ आहे. तेथे एक मजला वाढविण्यात येईल. त्याचप्रमाणे आगाराच्या जागेवर बहुमजली वाहनतळ बांधण्यात येईल. दिवाळीदरम्यान प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. मे २०२३ पर्यंत बहुमजली वाहनतळ तयार झालेले असेल.’’

Web Title: Satara Multi Storey Car Park Constructed Mahabaleshwar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top