सांगवडच्या बाधिताचे मुंबई कनेक्‍शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

परळ (मुंबई) येथून पाटण तालुक्‍यातील सांगवड येथे आलेल्या एसटी वाहकाचा अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने सांगवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मल्हारपेठ (जि. सातारा) : सांगवड येथील कुटुंब परळ येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असते. तर संबंधित बाधित व्यक्ती ही राज्य मार्ग परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहे. ता. 25 जून रोजी पहाटे ते मुंबईहून नवारस्ता येथे आले आणि तेथून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने दुचाकीवरून सांगवड येथे पोच केले. मात्र, 26 रोजी त्रास वाढल्याने त्यांना तातडीने कऱ्हाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, संबंधित व्यक्तीचा आजार संशयित वाटल्याने त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. काल सकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. 

दरम्यान, सांगवड येथील बधिताचे कुटुंब छोटे असले तरी मुंबईहून येतानाच त्यांनी आपली घरातच वेगळी सोय करा, असे सांगितल्यामुळे मुंबईहून आल्याबरोबर त्यांची घरातच वेगळी सोय केली होती. मात्र, आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सोमवारी सकाळीच पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पोलिस उपअधीक्षक आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी सांगवड येथील बाधित कुटुंबाच्या घरी तातडीने दाखल झाले आणि बधिताची पत्नी आणि चुलते यांना क्वारंटाइन करून त्या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले. पोलिसांनी संपूर्ण सांगवडचा परिसर सील केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mumbai Connection Of Sangwad's Corona Affected Patient