esakal | सातारा पालिकेपुढे उत्‍पन्नवाढीचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipality

सातारा पालिकेपुढे उत्‍पन्नवाढीचे आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : साताऱ्यातील व्‍यावसयिक मिळकतींची कोरोना काळातील घरपट्टीमाफीचा निर्णय सातारा पालिकेने घेतला होता. त्यामुळे पालिकेच्‍या उत्‍पन्नात सुमारे ७१ लाखांची तूट येणार आहे. सर्वसाधारण सभेत घेतलेल्‍या निर्णयानुसार सवलतीची बिले देत सातारा पालिकेने मिळकतींची करवसुली सुरू केली असली तरी इतर उपक्रम राबवत पालिकेने उत्‍पन्नवाढीवर भर देण्‍याची गरज आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्‍यासाठी पुकारण्‍यात आलेल्‍या देशव्‍यापी लॉकडाउनमुळे सर्व व्‍यवहार ठप्‍प झाले होते. सुमारे तीन महिने कडकडीत लॉकडाउन पाळल्‍यानंतर शासन नियमानुसार सर्वच ठिकाणचे व्‍यवहार पुन्‍हा अंशत: सुरू झाले. व्‍यवहार पूर्ववत होत असले तरी बाजारपेठेतील मंदावलेले अर्थचक्र गती घेत नव्‍हते. यामुळे साताऱ्यातील व्‍यावसायिक मिळकतधारकांनी घरपट्टीत सूट देण्‍याची मागणी सातारा पालिकेकडे केली होती. यानुसार हा विषय सातारा पालिकेच्‍या सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी घेण्‍यात आला. या विषयावरील चर्चेअंती नगर विकास आघाडीने व्‍यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्‍य नागरिकांची देखील घरपट्टी माफ करण्‍याची मागणी केली होती.

सभेदरम्‍यान सातारा विकास आघाडीने व्‍यावसायिक मिळकतदारांना घरपट्टीतून काहीअंशी माफी देण्‍याचा निर्णय बहुमताने मंजूर केला. अगोदरच इतर कारणांमुळे पालिकेच्‍या सर्वच प्रकाराच्‍या वसुलीवर मर्यादा पडल्‍या असून, घरपट्टी माफीच्‍या निर्णयामुळे पालिकेच्‍या उत्‍पन्नात ७१ लाखांची तूट निर्माण होणार आहे. सध्‍या पालिकेची वसुली अत्‍यंत संथगतीने सुरू असून, पालिकेने घेतलेल्‍या निर्णयानुसार नागरिकांना जाहीर केलेल्‍या सवलतीनुसार मिळकतकर वसुलीच्‍या नोटिसा पालिकेकडून बजावण्‍यात आलेल्‍या आहेत.

नोटिसांनुसार नागरिक थकीत मिळकतकर पालिकेकडे जमा करत आहेत. येणारे उत्‍पन्न आणि प्रशासकीय खर्चाचा ताळमेळ घालताना पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिकेच्‍या उत्‍पन्नाचे स्‍त्रोत आटत चालल्‍याचे दिसून येत असून, त्‍याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. आगामी काळात विकासकामांना चालना मिळावी, यासाठी पालिकेला स्‍वउत्‍पन्न वाढीसाठीचे उपक्रम हाती घेणे आवश्‍‍यक आहे.

बागा सुरू कराव्‍यात

पालिकेच्‍या मालकीच्‍या सातारा शहरात बागा आहेत. यापैकी राजवाडा येथील बाग पालिकेच्‍या उत्‍पन्नाचा मुख्‍य स्‍त्रोत आहे. या बागा कोरोनामुळे बंद आहेत. शासन निर्णयानुसार सर्वच व्‍यवहार पूर्ववत होत असताना पालिकेने राजवाडा तसेच गुरुवार पेठेतील बाग सुरू करण्‍यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

loading image
go to top