सातारा पालिकेचे ३० कोटी तिजोरीबाहेरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipality

सातारा पालिकेचे ३० कोटी तिजोरीबाहेरच

सातारा : शहर आणि परिसरातील मिळकतींची थकबाकी वसुलीसाठी पालिकेची तीन पथके कार्यरत आहेत. या तीन पथकांच्‍या सांघिक प्रयत्‍नांमुळे ४३ कोटीपैकी १२ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली असून, उर्वरित ३० कोटी अजूनही पालिकेच्‍या तिजोरीबाहेरच आहेत. तिजोरीबाहेरील पैसे पुन्‍हा तिजोरीत जमा करण्‍यासाठीच्‍या प्रशासकीय प्रक्रियांना पालिकेत गती आली असून, याचाच एक भाग म्‍हणून शहरातील सुमारे २१७ थकबाकीदारांना मिळकत जप्‍तीच्‍या नोटिसा बजावण्‍यात आल्‍या आहेत.

कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे गेल्‍या दोन वर्षांपूर्वी संपूर्ण अर्थचक्र थांबले होते. या थांबलेल्‍या अर्थचक्राचा फटका व्‍यावसायिक, कष्‍टकरी, नोकरदार यांच्‍याबरोबरच सर्वसामान्‍य नागरिकांना, तसेच शासकीय यंत्रणांना मोठ्या प्रमाणात बसला होता. कोरोनाचा कहर आटोक्‍यात येऊ लागल्‍यानंतर शासनाने अनलॉक प्रक्रिया जाहीर केली आणि थांबलेले अर्थचक्र पुन्‍हा गतिमान होण्‍यास मदत झाली. अर्थचक्र सुरू झाल्‍यानंतर शासकीय यंत्रणांनी सर्वच पातळीवरील येणेदेणे बाकी वसुली करत शासनाच्‍या तिजोरीत भर घालण्‍यास सुरुवात केली. यामध्‍ये सातारा पालिकेचादेखील समावेश आहे.

सातारा पालिकेस मालमत्ता, तसेच इतर करांपोटी साताऱ्यातील नागरिकांकडून सुमारे ४३ कोटी रुपये येणे बाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्‍यासाठी पालिकेचा वसुली विभाग गेल्‍या काही दिवसांपासून कार्यरत आहे. वसुली विभागाच्‍या कारभारावर पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्‍त मुख्‍याधिकारी पराग कोडुगले यांचे लक्ष असून, त्‍यांनी वसुलीसाठी प्रशांत खटावकर, अतुल दिसले, प्रसन्ना जाधव यांच्‍या मदतीने तीन पथके स्थापन केली आहेत. या पथकांच्‍या सातत्यपूर्ण आणि सांघिक प्रयत्‍नांमुळे फेब्रुवारी महिन्‍याच्‍या अखेरीस ४३ कोटींच्‍या एकूण थकबाकीपैकी १२ कोटी ५० लाखांची वसुली झाली आहे. वसुलीसाठी पालिकेच्‍या हातात फक्‍त ३२ दिवस बाकी असून, या कालावधीत उर्वरित ३० कोटी वसूल करण्‍याचे शिवधनुष्‍य पालिका प्रशासनास पेलावे लागणार आहे. वसुलीचाच भाग म्‍हणून पालिका प्रशासनाने शहरातील २१७ मिळकतधारकांना जप्‍तीच्‍या नोटिसा देखील बजावल्‍या आहेत.

नळजोडण्‍या तोडण्‍याचे काम हाती

वसुलीसाठी नेमलेल्‍या पथकांकडून मिळकती जप्‍तीच्‍या नोटिसा बजावण्‍याबरोबरच नळजोडण्‍या तोडण्‍याचे काम हाती घेण्‍यात आले आहे. आगामी काळात अशा कारवायांमध्‍ये वाढ होण्‍याची शक्‍यता असून, नागरिकांनी गैरसोय टाळण्‍यासाठी थकबाकी भरून पालिकेस सहकार्य करण्‍याचे आवाहन वसुली विभागाचे प्रमुख प्रशांत खटावकर यांनी केले आहे.

Web Title: Satara Municipal Corporation 30 Crore Arrears Notice Of Confiscation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..