Satara Municipal Corporation : प्रभाग बदलाच्‍या चर्चेने इच्‍छुकांत धाकधूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipality

Satara Municipal Corporation : प्रभाग बदलाच्‍या चर्चेने इच्‍छुकांत धाकधूक

सातारा : राजकीय, तसेच न्‍यायालयीन कारणास्‍तव निवडणुका लांबणीवर पडत असतानाच राज्‍य शासनाने महानगरपालिकांमधील प्रभागांची फेररचना करण्‍याचे जाहीर केले आहे. प्रभाग फेररचनेचे हे लोण महापालिकांमधून नगरपालिकांमध्येही आले तर? या चर्चेने साताऱ्यासह सर्वच ठिकाणच्‍या इच्‍छुकांची धाकधूक वाढली आहे. प्रभाग बदलल्‍यास केलेला खर्च पाण्‍यात जाऊन नवीन प्रभागरचनेनुसार पुन्‍हा खर्चाच्‍या जुळणीच्‍या कल्‍पनेने अनेकांनी धास्ती घेतली आहे.

राज्‍यातील महानगरपालिकांसह नगरपालिकांची मुदत संपल्‍याने अनेक ठिकाणचा कारभार प्रशासकाच्‍या मार्फत सुरू आहे. मुदत संपलेल्‍या या ठिकाणच्‍या मतदार याद्या अद्ययावत करत त्‍याठिकाणच्‍या प्रभाग रचना निश्‍चितीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यानुसार महापालिकांमध्‍ये तीन सदस्‍यीय, तर पालिकांमध्‍ये द्विसदस्‍यीय प्रभाग तयार करण्‍यात आले. महाविकास आघाडीच्‍या काळातील निर्णयाला मार्च महिन्‍यात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्‍थगिती दिली.

या स्‍थगितीमुळे महानगरपालिकांच्‍या निवडणुका पुन्‍हा एकदा लांबणीवर पडल्‍या. या निवडणुका लांबत असतानाच पालिकांच्‍या निवडणुकांसह इतर स्‍थानिक स्‍वराज संस्‍थांच्‍या निवडणुकीबाबत प्रश्‍‍न निर्माण झाला होता. निवडणूक, आज जाहीर होईल, उद्या होईल, या आशेवर असणाऱ्या इच्‍छुकांनी मुक्‍त हस्‍ताने सणासुदीत खर्च करत मतांची बेगमी करण्‍याचे काम सुरू केले होते. निवडणूक थोड्या दिवसांत, महिनाभरात जाहीर होण्‍याच्‍या आशेवर इच्‍छुकांची वाटचाल, पेरणी सुरू असतानाच महापालिकांतील प्रभाग रचना बदलण्‍याचे आदेश झाले. महापालिकातील हे आदेश नंतर पालिकेत आले तर? या चर्चेमुळे इच्‍छुकांची धाकधूक वाढू लागली आहे.

आता माघार नाही...

दहीहंडी, गणेशोत्‍सव, नवरात्रीसह इतर सर्वच सणांना इव्‍हेंटचे स्वरूप देण्‍याबरोबरच जेवणावळीसाठी सातारा, कऱ्हाड, फलटण, महाबळेश्‍‍वर, वाई, पाचगणी, रहिमतपूर, म्‍हसवड येथील इच्‍छुकांनी अक्षरक्ष: धुरळा उडवला. ऑक्‍टोबर, नोव्‍हेंबरमध्‍ये निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज वर्तविण्‍यात येत असल्‍याने इच्‍छुकांना जास्‍तीचे स्‍फुरण आले होते. निवडणुका लांबणीवर पडू लागल्‍याने नंतरच्‍या काळात इच्‍छुकांनी हात आखडता घेण्‍यास सुरुवात केली, तरीही त्‍यांचे समर्थक इच्छुकांनी आतापर्यंत किती खर्च केला? याचे आकडे सांगत कोणत्‍याही परिस्‍थितीत माघार नसल्‍याचे सांगत होते. त्‍यांच्‍या या सांगण्‍यामुळे साताऱ्यातील प्रत्‍येक प्रभागात कोपरा चर्चांना उधाण आले होते. भेटीगाठी, जेवणावळींच्‍या आधारे जनमताचा कानोसा घेणाऱ्यांच्‍या निवडणुकांच्या तारखांकडे लक्ष लागून राहिले होते.