
Satara News : खोकी, हातगाड्यांवर पालिका ‘मेहरबान’
कऱ्हाड : शहरातील चौकात हातगाड्यांसह खोक्यावरून राजकारण चांगलेच तापणार आहे. जवळपास १७ वर्षांपासून शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. परिणामी हातगाड्यांसह खोक्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे.
शहरातील चौकात पालिका पदाधिकाऱ्यांची नावे सांगून हातगाड्यांसहीत खोकीधारकांकडून अधिकाऱ्यांनाच धमाकवण्याचे प्रकार होत आहे. प्रशासकीय कारभाराची वर्षपूर्ती झाली तरीही त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.
त्यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबावही आणला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हातगाड्यावरील कारवाई आणि त्यांच्या नोंदी घेण्याचा खेळ केवळ कागदावर रंगतो आहे.
शहरात खोकी, हातगाडे किती आहेत, त्याची माहिती घेण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. मात्र त्याची माहिती प्रसिद्ध केलेली नाही. वास्तविक, २००१ नंतरची कसलीच अधिकृत आकडेवारी पालिकेकडे नाही. त्यामुळेच हॉकर्स झोनचा प्रश्न प्रलंबित पडला आहे.
मध्यंतरी हातगाडाधारक संघटनेला अधिकाऱ्यांनी हॉकर्स झोन करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी त्याला खो घातल्याने तो प्रस्ताव गुंडाळला गेला. त्यामुळे खोकी, हातगाडे शहराच्या सौंदर्यात बाधा ठरताहेत. अतिक्रमण अद्यापही रस्त्यावर जशीच्या तशीच असल्याने पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाला बाधा होते आहे.
कृष्णा नाका ते बस स्थानक येथील अतिक्रमण हटविण्याची मोहीम पालिकेने काही कालावधीसाठी हाती घेतली. मात्र, ती आजअखेर बारगळलेलीच आहे. त्यामुळे शहरात हातगाड्यांसह रस्त्यावर बसून साहित्य विकणाऱ्यांची गर्दी वाढते आहे. हातगाड्यांसह रस्त्यावर बसून विक्रीस बंदी आहे.
मात्र, पालिका शहरात हॉकर्स झोन करत नसल्याने त्यांच्यावर ती वेळ आली आहे. पालिका हॉकर्स झोनच्या मुद्द्यावर २००१ पासून केवळ कागदोपत्री घोडीच नाचवली जात आहेत. हातगाड्यांवर मालकी असलेल्यांची पदाधिकाऱ्यांसोबत ऊठबस असल्याने त्यांचीच जास्त मेहेरबानी असल्याचे दिसते. त्यामुळे हॉकर्स झोनच्या केवळ चर्चाच रंगताहेत. खोकी, हातगाड्यांचा २००१ पासून ठोस निर्णय होतानाच दिसत नाही.
याचाही पाठपुरावा नाही...
उच्च न्यायालयाने त्यासाठी अटींसह मार्गदर्शक तत्त्वेही ठरवली आहेत. मात्र, त्याचाही पाठपुरावा करून पालिका तो प्रश्न मार्गी लावताना दिसत नाही. हॉकर्स झोनबाबात निर्णय घेण्यास होणारी टाळाटाळ आता शहराच्या सौंदर्यास बाधक ठरताना दिसते. पालिकेतून ठोस निर्णय झालेलाच नसल्याने खोकी, हातगाड्यांमुळे वाहतूक कोडी वाढते आहे. हॉकर्स झोनच्या प्रश्नात जटीलता निर्माण झाली असली, तरी उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यावर निर्णय झाल्यास अधिक सुलभात येणार आहे.
येथे आहेत, खोकी, हातगाड्यांची गर्दी
शहरातील मुख्य बाजारपेठ
बस स्थानक परिसर
स्टेशन रस्ता ते दत्त चौक
पाटण कॉलनीबाहेरील संगम पेट्रोल पंप
आझाद चौक, मारुती मंदिर चौक ते नेहरू चौक
कोल्हापूर नाक्यावरही हातगाड्यांची गर्दी
कृष्णा घाटावरही खोकी, हातगाड्यांची संख्या वाढली