Satara : सातारकरांनो, कर भरा आता ऑनलाइन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Municipality

Satara : सातारकरांनो, कर भरा आता ऑनलाइन

सातारा : मालमत्ता कराचे संकलन वेगाने होण्‍यासाठी सातारा पालिकेने मिळकतधारकांच्‍या सोयीसाठी बॅंकांच्‍या मदतीने चार क्‍युआर कोड विकसित केले आहेत. या कोडशिवाय येत्‍या काळात पालिका ऑनलाइन कर संकलन प्रणाली सुरू करणार आहे. यासाठी इंटिग्रेटेड वेब बेस पोर्टल प्रकल्‍पाची मदत घेण्‍यात येत असून यासाठीचे तांत्रिक प्रशिक्षण सध्‍या पालिकेत सुरू आहे.

हद्दवाढीनंतर शाहूपुरी, विलासपूर या दोन ग्रामपंचायती तसेच शाहूनगर, पिरवाडी यासह इतर उपनगरे पालिकेत आली. विस्‍तारित भागांसह मूळ सातारा शहरातील मिळकतींची संख्‍या आता ४० हजारांच्‍या घरात पोचली आहे. या मिळकतधारकांना पालिकेच्‍या माध्‍यमातून विविध सुविधा पुरविण्‍यात येतात. या सुविधांच्‍या बदल्‍यात पालिका त्‍यांच्‍याकडून मिळकत कराची आकारणी करते. दरवर्षी यासाठी पालिकेचा वसुली विभाग कार्यरत असतो. कर मागणीपत्रे देणे, करांची वसुली करणे, थकबाकीपोटी मिळकती जप्‍त करणे, नळजोडण्‍या तोडणे आदी कारवाया करत पालिकेचा वसुली विभाग करांचा भरणा करून तो तिजोरीत जमा करत असतो. या प्रक्रियेत गतिमानता येण्‍यासाठी पालिका प्रशासन विविध अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत आहे.

याच अनुषंगाने राज्‍य शासनाने कर संकलनासाठी पायलट प्रोजेक्‍ट राबविण्‍याचा निर्णय घेतला आहे. यानुसार इंटिग्रेटेड वेब बेस पोर्टलच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन कर संकलन प्रणाली विकसित करण्‍यात येत आहे. यासाठीचे तांत्रिक प्रशिक्षण आणि आवश्‍‍यक त्‍या सुविधा तसेच अनुभवी मनुष्‍यबळ पालिकेच्‍या वतीने उभारण्‍यात येत आहे. यासाठीचा प्रशिक्षण कार्यक्रम पालिकेत नुकताच पार पडला. शासनाच्‍या आदेशानुसार विकसित करण्‍यात येणारी ही ऑनलाइन प्रणाली कार्यान्‍वित झाल्‍यानंतर तयार झालेल्‍या स्‍वतंत्र क्‍युआर कोडव्‍दारे सातारकर कोठूनही मोबाईलच्‍या मदतीने घरपट्टीसह इतर करांचा भरणा थेट पालिकेच्‍या खात्‍यात करू शकणार आहेत.

या प्रणालीमुळे कर संकलनातील किचकटपणा कमी होण्‍याबरोबरच पालिकेच्‍या नागरी सुविधा केंद्रात होणारी गर्दी, कर भरण्‍यासाठी लागणाऱ्या रांगांचे चित्र आगामी काळात दिसणार नाही.

नव्‍या पध्‍दतीत असा भरा कर

पालिकेने नुकतीच घरपट्टीसह इतर करांचा भरणा नागरिकांना सुलभतेने करता यावा, यासाठी चार बँकांच्‍या मदतीने चार क्‍युआर कोड विकसित केले आहेत. हे कोड पालिकेत लावण्‍यात आले असून वसुलीसाठी आलेल्‍या कर्मचाऱ्यांकडून ते मिळकतधारकांना देखील देण्‍यात येत आहेत. या कोडमुळे करांचा भरणा थेट पालिकेच्‍या खात्‍यात जमा होत आहे. या सुविधेबरोबरच पालिकेने वसुलीच्‍या कामात आणखी गतिमानता आणण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला आहे.

Web Title: Satara Municipality Tax Online Bank Four Qr Codes Home

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..