Satara : राष्‍ट्रवादी गटांतर्गत वाढली धुसफूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

Satara : राष्‍ट्रवादी गटांतर्गत वाढली धुसफूस

मल्हारपेठ : विभागातील सर्वच गावांत राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांत दोन गटांतर्गत धुसफूस वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत पाटणकर गटासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. मल्हारपेठ, विहे, निसरे, उरुल, ठोमसे, सोनाईचीवाडी, नावडी, वेताळवाडी आदी गावांत राष्ट्रवादीला दुफळीचे ग्रहण लागल्याने आगामी निवडणुकीत पाटणकर गटाची डोकेदुखी वाढणार आहे. वेळीच दुफळी थांबवण्यासाठी पाटणकर पिता-पुत्रांनी लक्ष घालण्याची मागणी जुन्या कार्यकर्त्यांतून होत आहे.

गेल्या महिनाभरापासून तालुक्याच्या प्रत्येक विभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. मात्र, प्रत्येक गावात जुन्या व नव्या कार्यकर्त्यांत मोठी मतभिन्नता झाली आहे. त्यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून येऊ लागले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायती समिती निवडणुकांत पाटणकर पिता-पुत्रांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा विभागातील प्रत्येक गावात राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक या सर्व प्रक्रियेतून वगळण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या वादाचे परिवर्तन आगामी निवडणुकांत दिसून आल्यास राष्ट्रवादीचे नुकसान होऊ शकते. एकीकडे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी सत्कार कार्यक्रम, विकासकामांची उद्‌घाटने, भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. आगामी निवडणुकीत मल्हारपेठ विभागाचे चित्र बदलण्यासाठी देसाई गटाने कंबर कसली आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीत कुरघोड्यांना उत आला आहे.

...तर राष्ट्रवादीचे नुकसान

पदाधिकारी बैठकांत फक्त मोजक्याच कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात असल्याने मल्हारपेठ विभागातील राष्ट्रवादीला आलेली मरगळ घालवण्यासाठी पाटणकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. गेल्या वेळच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली मते विचारात घेता इथे अजूनही दोन्ही गटांत ''काँटे की टक्कर'' पाहावयास मिळेल. पण, गटांतर्गत उफाळलेला वाद विकोपाला गेल्यास मल्हारपेठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणांत राष्ट्रवादीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Satara Nationalist Congress Party Group Increased Confusion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..