
सातारा : राष्ट्रवादीला लढायचंय की, काही ‘साध्य’ करायचंय?
सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी काल राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीमध्ये त्यांच्याच पक्षाच्या विधानसभेच्या उमेदवाराला बोलावण्यात आले नाही. दोन प्रबळ गटांबरोबर लढतीची भाषा करताना आपल्या शिलेदारांची वज्रमूठ असावी लागते, हे साधे गणित राष्ट्रवादी काल विसरली. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानात उतरण्यापूर्वीच दोन्हीही राजेंबरोबर खरोखरची लढाई करायची आहे की नाही, या राष्ट्रवादीच्या मनसुब्यावरच प्रश्न उपस्थित होतो आहे.
सातारा पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागवार आरक्षण नुकतेच जाहीर झाले. कोणत्या प्रभागात कोणाला उभे राहता येणार, हे स्पष्ट झाल्याने इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. इच्छुकांमधील तगडा उमेदवार कोण, याची चाचपणी सुरू असली, तरी पालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचे दावेदार असणाऱ्या सातारा विकास व नगर विकास आघाडीकडून अद्याप कोणत्याच अधिकृत हालचालींना सुरवात झालेली नाही. दोन्ही बाजूंकडून कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही. असे असले, तरी दोन्ही राजे भाजपमध्ये असल्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी मैदानात उतरणार का, याची सातारकरांमध्ये चर्चा सुरू होती.
यापूर्वी राष्ट्रवादीचे विधानसभेचे उमेदवार दीपक पवार तसेच आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा पालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते; परंतु निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून त्याबाबत कोणतीही जाहीर चर्चा झाली नव्हती. अशातच काल आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा पालिका निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली. त्यात निवडणूक लढण्याचे जाहीर करण्यात आले; परंतु या बैठकीला या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या दीपक पवार यांना बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत गोंधळ आहे किंवा जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करायचा आहे का, असा प्रश्न सहाजिकच उपस्थित होतो आहे.
तसे पाहिले तर, या बैठकीच्या नियोजनातच दीपक पवार यांचा सहभाग असणे आवश्यक होते. शशिकांत शिंदे हे सध्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाहीत. ते पक्षासाठी कोरेगावचे प्रतिनिधित्व करतात. अशा परिस्थितीत सातारा विधानसभा मतदारसंघातील पालिका असो किंवा इतर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नियोजनात तेथील आमदारकीचा उमेदवार असणे आवश्यकच होते. मागील पालिका निवडणुकीवेळी दीपक पवार भारतीय जनता पक्षात होते. त्या वेळी पालिकेच्या निवडणुकीच्या नियोजनाची धुरा त्यांच्या खांद्यावरच देण्यात आली होती. तेव्हा भाजपचे सहा उमेदवार निवडूनही आले होते; परंतु या वेळी नियोजनाच्या बैठकीतच दीपक पवार नव्हते.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत स्वत:साठी मते आवश्यक असताना शशिकांत शिंदे यांनी दीपक पवार यांना सोबत घेतले होते. मग या वेळी नेमकी माशी शिंकली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर ही बैठक झाल्याचे सांगितले जाते. मग, दीपक पवारांना घेऊ नका, असा त्यांचा संदेश होता का, असा सवाल सातारकरांना पडला आहे. यातून राष्ट्रवादीला महाविकास आघाडीच्या नावाखाली दुसऱ्या गटालाच मदत करायची आहे का, शशिकांत शिंदेंना आपल्या विधानसभेची गणिते जुळवायचीत का, आगामी काळात कोणाची पक्षात पुन्हा एन्ट्री होणार आहे का, अशा शंका सातारकरांच्या मनात निर्माण झाल्या आहेत.
पालिका निवडणुकीत सातारा व नगर विकास हे दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी आहेत. अशा परिस्थितीत या दोघांना खरोखर मात देण्यासाठी तिसरा पर्याय आणायचाच असेल तर, तो तितकाच एकसंध असावा लागणार आहे. याचे भान महाविकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांना ठेवावे लागणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा अंतर्गत विसंगती दूर करावी लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे सातारा मतदारसंघात दोन्ही राजेंना वगळून खरोखरच पक्ष वाढवायचा असल्यास वरिष्ठ नेतृत्वालाही आगामी पालिका निवडणुकीत ठोस भूमिका घ्यावी लागेल.
काल झालेल्या बैठकीच्या नियोजनात दीपक पवार का नव्हते, हे जाणून घेण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही.
सातारा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीकडून मी नेतृत्व करतो. त्यामुळे पालिका निवडणूक लढविण्याची माझी जबाबदारी आहे; परंतु काल शशिकांत शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीची कल्पना मला नव्हती. हे का व कशासाठी झाले, त्याच्या मागची गणिते काय आहेत, हे पाहावे लागेल. मी सातारकरांची फसवणूक होऊन देणार नाही. याबाबत लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईन.
- दीपक पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
Web Title: Satara Ncp Wants Fight Achieve Something
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..