esakal | साताऱ्यात कृषी स्वावलंबन योजनेतून तब्बल 120 विहिरी पूर्ण; कृषी विभागाची माहिती

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन विविध योजनेचा लाभ दिला आहे.

साताऱ्यात कृषी स्वावलंबन योजनेतून तब्बल 120 विहिरी पूर्ण; कृषी विभागाची माहिती
sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कोरोनाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड करून प्रत्येकी अडीच लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. या अनुदानातून जिल्हाभरात 120 विहिरींचे काम पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 

कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन विविध योजनेचा लाभ दिला आहे. कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधून जिल्ह्यातील सुमारे 120 अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. या योजनेचा सोळशी (ता. कोरेगाव) येथील आवाडे या लाभार्थ्यांच्या विहिरीचे प्रातिनिधिक स्वरूपात कृषी सभापती मंगेश धुमाळ व कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी कृषी अधिकारी शिवाजी भांडवलकर, आकाश सोळसकर, धनंजय सोळसकर, देवाआप्पा सोळसकर, अमोल सोळसकर, यशवंत धुमाळ, किशोर धुमाळ आदी उपस्थित होते. 

आनेवाडी-तासवडे टोलनाक्‍यावर सातारकरांना सूट द्या; खासदार उदयनराजे आक्रमक

शेतकरी सक्षमीकरणासाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. यामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांच्या विहिरींचे काम पूर्णत्वास नेले आहे. पुढील काळातही जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन मंगेश धुमाळ यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे