दूषित पाण्यामुळे 50 जणांना अतिसाराची लागण; 'आरोग्य'वर चाफळच्या नागरिकांचा संताप

कृष्णात साळुंखे
Saturday, 16 January 2021

संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन चार ते पाच दिवसांपूर्वी फुटली. त्यामुळे गावात एक दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता.

चाफळ (जि. सातारा) : येथील ग्रामपंचायत हद्दीतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमधून दूषित पाण्याचा पुरवठा होऊन सुमारे 50 जणांना अतिसाराची लागण झाली. त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याविषयी गंभीर समस्या भेडसावत आहे. साथीचा फैलाव वाढत असूनही आरोग्य विभागाने तातडीची पावले उचलली नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
 
संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन चार ते पाच दिवसांपूर्वी फुटली. त्यामुळे गावात एक दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. मात्र, पाइपलाइन दुरुस्त झाल्यानंतर गावाला पाणीपुरवठा करण्यात आला होता. पाण्याची टाकी साफ न करताच पाणी सोडल्यामुळे पाइपलाइनमधील घाण टाकीत गेल्याने गावात अतिसार सदृश साथीचा फैलाव झाला असावा, अशी शक्‍यता नागरिकांनी व्यक्त केली. गावात अतिसाराची लागण झाली असतानाही ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पावले उचलली जात नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या गावात लहान मुलांपासून मोठ्या नागरिकांना उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू आहे. सर्व रुग्णांना खासगी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

मेडिकल कॉलेजसाठी 495 कोटींचा निधी मंजूर; आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश

ग्रामस्थांनी सरपंच सूर्यकांत पाटील यांच्याशी माहिती घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही. ग्रामसेवक निवडणुकीसाठी सेवेत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना शक्‍य त्या दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे. आज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील पिण्याच्या पाणी तपासणीसाठी पुढे पाठवले. दवाखान्यात येणाऱ्या सर्व रुग्णांना आवश्‍यक योग्य ती आरोग्य सुविधा पुरवण्यात आलेली आहे, असे डॉ. कुराडे यांनी सांगितले. 

शेट्टी, खोतांना शेतकऱ्यांविषयी काही देणं-घेणं नाही; पंजाबराव पाटलांची टीका

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News 50 People Sick Due To Contaminated Water At Chafal