
मार्च महिन्यापासून सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या कोरोना लस प्रत्यक्ष देण्याची प्रक्रिया आजपासून जिल्ह्यात राबविली जाणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.
सातारा : कोरोना संसर्गाची लस देण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासन सज्ज झाले असून, जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील नऊ ठिकाणी 900 जणांना आज (ता. 16) लसीकरण होत आहे. पाच दिवस सलग ही प्रक्रिया राबवता येईल, एवढी लस सध्या रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे.
मार्च महिन्यापासून सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या कोरोना लस प्रत्यक्ष देण्याची प्रक्रिया आजपासून जिल्ह्यात राबविली जाणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. त्यामध्ये 45 हजार जणांची नोंदणी झालेली आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यामध्ये कृष्णा हॉस्पिटल (कऱ्हाड), मिशन हॉस्पिटल (वाई) त्याचबरोबर कऱ्हाड व फलटण उपजिल्हा रुग्णालय, दहिवडी, खंडाळा, पाटण, कोरेगाव ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या नऊ ठिकाणी लसीकरण होणार आहे.
मेडिकल कॉलेजसाठी 495 कोटींचा निधी मंजूर; आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश
सातारा तालुक्यात सुमारे साडेचार हजार जणांची लसीकरणासाठी नोंद झाली आहे. त्यांचे लसीकरण जिल्हा रुग्णालयातील केंद्रात होणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव यांनी रुग्णालयात एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच जणांची टीम तयार केली आहे. कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचे समन्वयक म्हणून डॉ. चंद्रशेखर कारंजकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. उद्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसल व नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या उपस्थित जिल्हा रुग्णालयात लसीकरणाचा प्रारंभ होणार आहे. लसीकरणाबाबत नोंदणी केलेल्यांना ऑनलाइन पद्धतीने मेसेज व सेंटरची माहिती जाणार आहे.
कऱ्हाडला 81, तर पाटणला 75 टक्के मतदान; सोमवारी होणार निकालाचे चित्र स्पष्ट
पाच दिवस मोहीम चालेल एवढी लस
दरम्यान, आज जिल्हा रुग्णालयात 100 जणांचे लसीकरण होणार आहे. पाच दिवस ही मोहीम चालेल एवढी लस सध्या उपलब्ध आहे. आणखी लस मिळाल्यानंतर पुढचे लसीकरण होणार आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे