
फलटण शहराचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकीतील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन वर्षांपासून बंद स्थितीत असल्यामुळे ग्रामस्थांतून चिंता व्यक्त होत आहे.
कोळकी (जि. सातारा) : फलटण तालुक्यात आर्थिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या, तसेच फलटण शहराचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकीतील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन वर्षांपासून बंद स्थितीत असल्यामुळे ग्रामस्थांतून चिंता व्यक्त होत असून, गुन्हेगारी, अवैध धंदे, रस्त्यांवरील अपघातांना चालना मिळत आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी मागील दोन ते अडीच वर्षांपूर्वी येथील व्यापारी व ग्रामस्थांची बैठक घेऊन गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंबंधीचे महत्त्व सांगून आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यास अनेक व्यापारी व ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्या वेळी ग्रामस्थांच्या मदतीमधून पंचायतीतर्फे 17 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी दोन कॅमेरे ग्रामपंचायतीजवळ, दोन कॅमेरे मालोजीनगर येथील चोरमले सर यांच्या घराजवळ, चार कॅमेरे अक्षतनगर भाजीमंडई जवळील चौकात, दोन कॅमेरे फलटण- सांगली रोडवरील बॉंबे स्टिलजवळ, दोन कॅमेरे अनंत मंगल कार्यालयाजवळ, दोन कॅमेरे मालोजीनगर येथील ग्रामपंचायत ते वनदेव शेरी रोडवरील शेंडे यांच्या घराजवळ बसवले होते.
पिलीव घाटात सातारा-पंढरपूर बसवर दगडफेक; दरोड्याच्या अफवेने सातारा-सोलापूर पोलिसांची पळापळ
आजमितीस यातील फक्त ग्रामपंचायतीजवळचा कॅमेरा सुरू आहे. ग्रामपंचायतीने काही कॅमेरे वीज वितरण कंपनीच्या, तर काही बीएसएनएलच्या खांबांवर बसवले आहेत. ते सुद्धा कमी उंचीवर बसवले आहेत. त्यांच्या वायर्सची उंची कमी असल्याने रस्त्याने ट्रक, बस यासारखी उंच वाहने गेल्याने थोड्याच दिवसांत या वायर्स तुटल्या. कॅमेरे चालू स्थितीत असून, केवळ वायर्स तुटल्यामुळे येथील कॅमेरे गेल्या दोन वर्षांपासून बंद पडले आहेत.
जिल्ह्यातील टॉप टेन गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई
अक्षतनगर भाजी मंडईजवळील चौकात मधोमध एका उंच अशा खांबावर चार कॅमेरे बसवले होते. मात्र एका अज्ञात वाहनाच्या धडकेने तो खांब पडला. त्यामुळे यावरील चारी कॅमेरे बंद आहेत. हा चौक अतिशय संवेदनशील मानला जातो. या चौकामध्ये शिखर शिंगणापूर, श्री क्षेत्र गोंदवले, सांगली, फलटण, नगर या गावांकडील वाहनांची सतत वर्दळ चालू असते. या चौकामध्ये रस्त्यावर भाजीमंडई मोठ्या प्रमाणात भरते. एसटीचा बस थांबा याच चौकामध्ये आहे. या चौकात हॉटेलांची संख्या 25 च्या जवळपास आहे. त्यामुळे या वर्दळीच्या चौकातील कॅमेरा सुरू असणे फार गरजेचे आहे. कॅमेरे सुरू होते तेव्हा गुन्हेगारीवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता येत होते. शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना कॅमेऱ्याची मोठी मदत होत होती. ग्रामपंचायतीने ज्या कंत्राटदारांकडून कॅमेरे जागोजाग बसवून घेतले, त्याच्याबरोबर कॅमेऱ्यांच्या देखभालीचा करार न केल्याने ही अवस्था निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तेव्हा संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून हा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मी काळाच्या उदरात, विलीन झाल्यावर माझी सर्वजण आठवण काढतील
संपादन : बाळकृष्ण मधाळे