साताऱ्यातील वाहतुकीत सोमवारी बदल; मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

गिरीश चव्हाण
Sunday, 17 January 2021

मतमोजणीच्या दिवशी मोजणी केंद्राबाहेर गर्दी जमून वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

सातारा : सातारा तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी सोमवारी (ता.18) जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर त्या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिली आहे. 

मतमोजणीच्या दिवशी मोजणी केंद्राबाहेर गर्दी जमून वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. यादिवशी भूविकास बॅंक चौकाकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे तर बसस्थानकाकडून भूविकास बॅंक चौकाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून त्याकाळात आपतकालीन वाहने वगळता त्या मार्गावरुन येण्याजाण्यास इतर सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रासमोरील मार्ग बंद करण्यात येणार असल्याने त्या काळात मेढा, महाबळेश्‍वर मार्गे येणारी वाहने जुना आरटीओ चौकातून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातील.

साताऱ्यात कोरोनाच्या विनाशासाठी क्ष-किरण वैज्ञानिक अधिकाऱ्याने टोचून घेतली पहिली लस!

वाढेफाटा येथून येणाऱ्या बसेस जुना आरटीओ चौक मार्गे पारंगे चौकातून बसस्थानकात जातील. त्याचबरोबर या मार्गावरील इतर वाहने पारंगे चौकातून पोवईनाक्‍याकडे मार्गस्थ होतील. बॉंबे रेस्टॉरंट चौकातून मोळचा ओढा परिसराकडे जाणाऱ्या वाहनांनी त्यादिवशी राधिका रोडचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. वाहतुकीतील बदलांची दखल घेत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शेलार यांनी पत्रकाव्दारे केले आहे. 

कोरोना लसीचा चांगला परिणाम जनमानसांत दिसेल; गृहराज्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

वाहनांसाठी दोन पार्किंग तळ 
मतमोजणीसाठी येणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या वाहनांसाठी बसस्थानकासमोरील महसूल विभागाच्या जागेत वाहन तळ उभारण्यात येणार आहे. याचबरोबर निकाल ऐकण्यासाठी, तसेच प्रतिनिधी म्हणून येणाऱ्यांच्या वाहनासाठी भूविकास बॅंकेच्या मोकळ्या मैदानात वाहनतळ उभारण्यात येणार आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Changes In Traffic In Satara City On Monday