मोबाईल टॉवरविरोधात खातगुणकरांचा आक्रमक पवित्रा; 26 जानेवारीला बेमुदत उपोषण

ऋषिकेश पवार
Monday, 18 January 2021

टॉवर उभारणीच्या कामावर परिसरातील महिला व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम टाकून काढता पाय घेतला आहे.

विसापूर (जि. सातारा) : नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या किरणोत्सर्गामुळे खातगुण (ता. खटाव) येथील बस स्थानकाशेजारील माळ परिसरामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद पाडले. हा टॉवर गावापासून काही अंतर लांब उभा केला जावा व मानवी वस्तीत होत असलेला या मोबाईल टॉवर उभारणीचे काम तत्काळ बंद करावे, अन्यथा 26 जानेवारीला टॉवर बांधकामावर उपोषणास बसण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
 
खातगुणमधील माळ परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये घरे असून या भागामध्ये बस स्थानकही आहे. जवळच वेदावती हायस्कूल आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत वाढत आहे. परिणामी या ठिकाणी विद्यार्थी व नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे, भरवस्तीत मोबाईल टॉवर उभारून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे लक्षात येताच येथील स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या टॉवरला विरोध करत काम बंद पाडले. टॉवर उभारणीच्या कामावर परिसरातील महिला व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी काम टाकून काढता पाय घेतला आहे. प्रशासनाने मानवी आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या मोबाईल टॉवर उभारणीचे काम कायमस्वरूपी बंद पाडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. 

वडूजमध्ये मतदान अधिकाऱ्यास महसूल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण

टॉवर्समधून उत्सर्जित होणारी मोठ्या प्रमाणातील उष्णता ही आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. भविष्यात अशाच किरणोत्सर्जनामुळे (मोबाईल रेडिएशन) या भागामध्ये नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी मोबाईल टॉवरच्या बांधकामाजवळ बेमुदत उपोषणास बसणार असल्याची माहिती प्रवीण यादव यांनी दिली. हा टॉवर उभा करताना कोणतेच शासकीय नियम पाळलेले दिसत नाहीत. त्यामुळे हा टॉवर गावापासून काही अंतरावर स्थलांतरित करावा, अशी मागणी सुधीर लावंड यांनी केली. 

Gram Panchayat Results निढळला दहा वर्षांनंतर सत्तांतर; माजी सनदी अधिकाऱ्यांच्या गटाला जोर का झटका

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Citizens In Khatgun Stopped Work On The Mobile Tower