सावधान! मलकापुरात मोकाट कुत्र्यांमुळे फिरणेही मुश्‍कील; अपघातांतही मोठी वाढ

राजेंद्र ननावरे
Thursday, 21 January 2021

मलकापूर शहरात मलकापूर फाटा परिसरात मटण व चिकन विक्रीचे व्यवसाय असल्यामुळे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा कायमच राबता असतो.

मलकापूर (जि. सातारा) : शहरात मलकापूर फाटा व आगाशिवनगर परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे रात्री व पहाटे फिरणेही मुश्‍कील झाले आहे. पहाटेच्या सुमारास व्यायाम करणाऱ्यांबरोबर दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांचा मोकाट कुत्र्यांचे कळप पाठलाग करत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 

शहरात मलकापूर फाटा परिसरात मटण व चिकन विक्रीचे व्यवसाय असल्यामुळे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा कायमच राबता असतो. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्ता, भुयारी मार्ग, उड्डाणपूल व मंडई परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर मोकाट कुत्र्यांच्या कळवंडी दुचाकीस अचानक आडव्या येतात. त्यावेळी घाबरून खाली रस्त्यावर पडल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. आगाशिवनगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद माजवला आहे. रात्रीच्यावेळी गल्लीगल्लीतून कळवंड करत टोळकी फिरतात. नेमके झोपेच्या वेळेतच गोंधळ घातल्यामुळे दिवसभर काम करणाऱ्या नागरिकांच्या झोपेचे मात्र खोबरे होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नांसह नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालिकेकडे अनेक वेळा केली आहे. मात्र, आशा मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष यंत्रणा लागते, ती पालिकेकडे नाही याशिवाय प्राणीमित्रांचा सल्लाही महत्त्वाचा आहे. 

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे या विषयावर पालिकेच्या सभेत चर्चा होते. मात्र, कोणत्याही प्राण्यांवर कारवाई करताना वन्यजीव विभागाच्या नियमांचे पालन करावे लागते. कारवाईसाठी अनेक बंधने असल्याने नमके काय करावे, हा प्रश्न स्थानिक प्रशासनापुढे आहे. स्थानिक प्रशासनासह शासनाने अशा मोकाट कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक 
व वाहनधारकांमधून होत आहे. 

'मॉर्निंग वॉक' करणारांच्या हातात काठी 

आगाशिवनगर परिसरात दुभाजकात पथदिवे असल्यामुळे पहाटेपासूनच शेकडो आबालवृध्द व महिला "मॉर्निंग वॉक'ला येतात. मोकाट कुत्र्यांमुळे फिरायला येताना नागरिकांसह महिलांच्याही हातात काठ्या दिसत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Citizens Suffer Due To Stray Dogs In Malkapur City