
भांडवली अर्थव्यवस्था, जातीव्यवस्था, स्त्रियांचे शोषण या सर्वांना संपविल्याशिवाय पर्याय नाही, हे सत्य या महामारीच्या काळात अधिक स्पष्ट झाले आहे.
सातारा : श्रमिक मुक्ती दलाचे 33 वे अधिवेशन शनिवारी (ता. 23) व रविवारी (ता. 24) कासेगाव (जि. सांगली) येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन आणि प्रबोधन संस्थेत होणार आहे.
कोरोना महामारीने आरोग्य, रोजगार, उद्योग, एकंदर अर्थव्यवस्था अशा क्षेत्रांवर विपरित परिणाम केले आहेत. भांडवली अर्थव्यवस्था, जातीव्यवस्था, स्त्रियांचे शोषण या सर्वांना संपविल्याशिवाय पर्याय नाही, हे सत्य या महामारीच्या काळात अधिक स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पर्यायी शोषणमुक्त व समृद्ध निरोगी समाज आणण्यासाठी नव्या जोमाने चळवळ करण्याची गरज आहे. या संदर्भात या अधिवेशनात मुख्य चर्चा होणार आहे.
याबरोबरच कोरोना आणि लॉकडाउन काळातही गेल्या वर्षी झालेल्या फक्त प्रमुख चळवळींचा आढावा, केंद्राच्या अन्यायी कृषी धोरणाच्या विरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन, स्त्री वारसदारांना मालमत्तेत समान वाटा मिळण्यासाठी झालेला शासन निर्णय व त्याची अंमलबजावणी पूर्वानुलक्षी पद्धतीने लागू होण्यासाठीची चळवळ, शेतकरी आंदोलनाबाबत कटगुण (ता. खटाव, जि. सातारा) येथे झालेल्या आंदोलनानंतरच्या चळवळीचे टप्पे, लॉकडाउन नंतरच्या काळानंतर नव्याने संघटनात्मक मांडणी व नवे धोरण आखणे, संघटनांतर्गत अभ्यास व प्रबोधनाची आखणी या महत्त्वाच्या विषयावर या अधिवेशनात चर्चा करून संघटनेची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. शनिवारी (ता. 23) सकाळी अकराला ही परिषद सुरू होणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी दिली.
रणसिंगवाडीतील गुंड दीपक मसुगडे हद्दपार; पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई
संपादन : बाळकृष्ण मधाळे