माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी उदयनराजेंनी जिल्ह्यासाठी काय केलं सांगावं; काँग्रेसच्या नेत्याचं जोरदार प्रतिउत्तर

उमेश बांबरे
Thursday, 21 January 2021

साताऱ्यातील मेडिकल कॉलेजला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच उशीर झाला होता. राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना त्यांनी श्रेय वादातून कॉलेज रखडवले, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती.

सातारा : पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना आपण साताऱ्यात काय कामे केली यावर बोलले पाहिजे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्याचा किती विकास झाला हे पाहिले पाहिजे, असे प्रतिउत्तर युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी उदयनराजेंचा (Udayanraje Bhosale) नामोल्लेख टाळून दिले आहे. मुळात पृथ्वीराज चव्हाणांमुळे साताऱ्यात शासकिय मेडिकल कॉलेज आले आहे. आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉलेजच्या कामाला गती देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

साताऱ्यातील मेडिकल कॉलेजला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच उशीर झाला होता. राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना त्यांनी श्रेय वादातून कॉलेज रखडवले, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. या टीकेवरून युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून प्रतिउत्तर देत त्यांच्या आरोपाचे खंडन केले आहे. शिवराज मोरे म्हणाले, दहा वर्षात जिल्ह्याचा किती विकास झाला याचा विचार केला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर टीका करताना आपण साताऱ्यात काय कामे केली यावर बोलले पाहिजे. विकास कामे कोणत्याही पक्षाने करू देत पृथ्वीराज चव्हाण यांनी विकासकामांत कधीही बाधा आणली नाही. उलट पाठिंबा देण्याचे काम केलेले आहे.

तशी वेळ आली, तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार; उदयनराजेंचा प्रशासनाला इशारा  

पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा मेडिकल कॉलेजला परवानगी मिळवून दिली. त्याबाबतचा जीआरही माझ्याकडे आहे. त्यानंतर पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत होते. साधी वीट देखील लावण्याचे काम झाले नाही. आता कॉलेजच्या जागेचा वाद सोडविला गेला आहे. कोणी काहीही म्हटले तरी मेडिकल कॉलेज पृथ्वीराज चव्हाणांमुळे साताऱ्यात आलेले आहे. त्यांची इच्छा असती तर त्यांनी हे मेडिकल कॉलेज कऱ्हाडमध्ये केले असते. पण त्यांनी तसे केलेले नाही. सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. येथेच शासकिय मेडिकल कॉलेज व्हावे, ही त्यांची इच्छा होती.

उदयनराजेंच्या त्या कृतीची पोलिसांकडे माहिती गोळा; गृहराज्यमंत्र्यांचा निर्वाळा

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात या मेडिकल कॉलेजच्या कामाला गती देण्याचे काम पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून होईल. कारण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अजित देशमुख यांच्यासोबत या विषयावर त्यांच्या वारंवार बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या काळातच मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन झाल्याचे आपल्याला पहायला मिळेल, असेही श्री. मोरे यांनी स्पष्ट केले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Political News Congress Leader Shivraj More Criticizes MP Udayanraje Bhosale