साता-याला डॉ. सुरेश जगदाळेंच्या अनुभवचा फायदा हाेईल : डॉ. सुभाष चव्हाण

सिद्धार्थ लाटकर
Friday, 2 October 2020

डॉ. सुरेश जगदाळे यांची देखील सातारा जिल्ह्यात बदली झालेली आहे. यापुर्वी त्यांनी चार वर्ष सातार्‍यात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून सेवा बजावली आहे. डॉ. जगदाळे यांच्या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग करून घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाचा पुर्णवेळचा कारभार डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे साेपविण्यात आले आहे. यापुर्वी श्री. चव्हाण यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी हाेती. यापुर्वीचे सातारा जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अमोद गडीकर यांची रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात अधीक्षक म्हणून प्रशासकीय कारणास्तव नियुक्‍ती करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांची प्रशासकीय कारणास्तव सातार्‍यात शस्त्रक्रिया विभागाचे वर्ग 1 अधिकारी म्हणून बडती मिळाली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर सचिव विनायक घोडके यांच्या स्वाक्षरीने तब्बल 43 वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांचे गॅझेट गुरुवारी (ता.1) प्रसिद्ध झाले. बदली झालेल्या अधिकार्‍यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी तत्काळ हजर व्हावे, तसेच बदली अधिकार्‍यांना कोणतीही रजा मंजूर करण्यात येऊ नये, असे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. विहित मुदतीत पदस्थापनेवर हजर न झाल्यास शिस्तभंग व प्रशासकीय कारवाईचा इशारा संबधितांना देण्यात आला आहे.

खंडणी उकळणाऱ्या महिलांच्या आवाजाचे नमुने पुण्यात तपासणीला 

क-हाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन तडस यांची बुलढाणा येथे जिल्हा शल्यचिकित्सक पदावर बदली झाली आहे. डॉ. भाऊसाहेब चंदगौडा केम्पी पाटील यांची कोल्हापूर येथून रुग्णालय प्रशिक्षण केंद्र सातारा येथे बदली झाली आहे. डॉ. सुभाष चव्हाण यांची मध्यंतरी रत्नागिरीवरून सातारा जिल्हा रुग्णालयात प्रभारीपदाचा कारभार साेपविण्यात आला हाेता. त्यांच्याकडे दोन जिल्ह्यांचे कामकाज हाेते. आता त्यांची पुर्णवेळ सातारा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ते सातारा जिल्ह्याचे शल्यचिकित्सक म्हणून कामकाजात न्याय देऊ शकणार आहेत.

जम्बो हॉस्पिटलचे दरवाजे लवकर उघडा; सातारकरांची अपेक्षा 

डॉ. सुरेश जगदाळे यांची देखील सातारा जिल्ह्यात बदली झालेली आहे. यापुर्वी त्यांनी चार वर्ष सातार्‍यात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून सेवा बजावली आहे. डॉ. जगदाळे यांच्या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग करून घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जगदाळे यांना शस्त्रक्रिया विभाग वैद्यकीय अधिकारी म्हणून पदस्थापना देण्यात आली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Dr Shubhash Chavan Appointed As Civil Surgeon Of Satara