कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार द्या, अन्यथा 'रास्ता रोको'

सल्लाउद्दीन चोपदार
Saturday, 20 February 2021

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

म्हसवड (जि. सातारा) : अतिवृष्टीची नुकसानभरपाई, पीकविमा, नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये तातडीने मिळावेत, अन्यथा गुरुवारी (ता. 25) म्हसवड येथे सहा गावांच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

याबाबत तहसीलदार बी. एस. माने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, कुरणेवाडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, काळचौंडी या सहा गावांचे शेतकरी विनंती अर्ज करतो की, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासकीय पातळीवर पंचनामेही करण्यात आलेले आहेत. मात्र, अद्याप परिसरातील कोणत्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्याबरोबरच शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमाही मिळालेला नाही.

हे पण वाचा- कऱ्हाडातील 104 ग्रामपंचायतींचे मंगळवार, बुधवारी ठरणार नवे कारभारी

नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता 50 रुपये देण्याचे शासनाने जाहीर केले असताना आजपर्यंत पैसे जमा झाले नाहीत. मार्च महिन्याच्या अखेरीस सोसायटीच्या नियमानुसार कर्ज नियमित करावयाचे आहे. तत्पूर्वी सर्व मागण्यांचा जाणीवपूर्वक विचार करून लवकरात लवकर वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई, पीकविमा आणि प्रोत्साहनपर भत्त्याची रक्कम जमा करावी, अन्यथा नाईलाजास्तव गुरुवारी (ता. 25) पंचक्रोशीतील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने म्हसवड येथे सातारा-पंढरपूर रस्त्यावर सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Farmers Warned To Close Satara Pandharpur Road If Compensation Is Not Paid