कोरोनाचं संकट! महाबळेश्वरात 105 गावांत साध्या पद्धतीने यात्रा; देवस्थान समितीचा महत्वपूर्ण निर्णय

रविकांत बेलोशे
Monday, 25 January 2021

अतिशय दुर्गम अशा कोयना, सोळशी, कांदाटी या भागातील 105 गावांत यात्रा अगदी साध्या पद्धतीने होत आहेत.

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍यातील कोयना विभागातील जवळपास 105 गावांतील ग्रामस्थांनी कोरोनाच्या महामारीमुळे आपापल्या ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रा यावर्षी साध्या पद्धतीने साजऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. गावोगावी बैठक घेऊन ग्रामस्थ केवळ धार्मिक कार्यक्रम करत आहेत.
 
गावातील ग्रामदैवतांची यात्रा म्हणजे वार्षिक आनंदाचा दिवस. चाकरमानी, माहेरवाशिणी लेकी बाळी या यात्रोत्सवाला आवर्जून येतात. मोठ्या पद्धतीने हे उत्सव दर वर्षी साजरे केले जातात; परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटाने आणि शासनाच्या निर्बंधांमुळे ग्रामस्थांनी बैठक घेऊन यात्रा साध्या पद्धतीने साजऱ्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विजेच्या रोषणाईने मंदिरे उजळून निघत आहेत. धार्मिक कार्यक्रम, पालख्यांचे मिरवणूक, गोंधळ, महाअभिषेक, जागर, अगदी साध्या पद्धतीने होत आहेत. गावात ना मिठाई, खेळण्याची दुकाने फक्त धार्मिक कार्यक्रम पार पाडत आहेत. 

कडक सॅल्यूट! कोरेगावच्या जांबाज पोलिस अधिकाऱ्याचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

अतिशय दुर्गम अशा कोयना, सोळशी, कांदाटी या भागातील 105 गावांत यात्रा अगदी साध्या पद्धतीने होत आहेत. कोरोनामुळे वर्षभर उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने ग्रामस्थसुद्धा आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे फक्त धार्मिक कार्यक्रम साजरे करून यात्रा उरकून घेण्याचा निर्धार ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. अशाच पद्धतीने महाराष्ट्राचे मिनी काश्‍मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा येथील पद्मादेवी या देवीची यात्रा साध्या पद्धतीने आणि शासनाने दिलेल्या सूचना, अटींचे पालन करून साजरी होत आहे. 

भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषाने दुमदुमला मालवणचा किनारा

कोरोना महामारीमुळे व्यवसाय, उद्योगांवर मोठा परिणाम झाल्यामुळे सध्या ग्रामस्थ आर्थिक संकटात आहेत. असे असले तरी गर्दी करून संसर्ग होऊ नये आणि शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने आम्ही फक्त धार्मिक कार्यक्रम करून यात्रा साजऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. 
-विठ्ठल धनावडे, ग्रामस्थ, तापोळा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Festival Canceled In 105 Villages Of Mahabaleshwar Taluka