'सीईओ'च्या बंगल्यावर अवाढव्य खर्च; जिल्हा परिषदेत 51 विषयांवर वादळी चर्चा

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : कोरोनाच्या काळात विविध विभागांच्या अभ्यास दौऱ्यांना स्थगिती देण्याची सदस्यांची मागणी, 'सीईओ'च्या बंगल्यावर देखभाल-दुरुस्तीसाठी झालेला अवाढव्य खर्च, सर्वसाधारण सभेसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीला सदस्यांचा विरोध आदी मुद्द्यांवर नुकतीच झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष उदय कबुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ उपस्थित होते. सर्वसाधारण सभेत 51 विषय चर्चेसाठी अजेंड्यावर ठेवण्यात आले होते. त्यातील 50 विषय मंजूर करून एक विषय तहकूब करण्यात आला. सभेच्या सुरुवातीला हुतात्मा जवान संदीप रघुनाथ सावंत व सुजित नवनाथ किर्दत यांच्या कुटुंबीयांना एक-एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. 

सभेत सदस्य दत्ता अनपट यांनी प्राथमिक शाळांमध्ये शौचालयांची दुरवस्था असून, गेल्या वर्षी वादळात शाळांचे पत्रे उडून गेल्याचे सांगत आपत्ती निधी गेला कुठे? असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर सीईओ गौडा यांनी या दुरुस्तीसाठी स्वतंत्र तरतूद केली जाणार असल्याचे सांगत सद्यःस्थितीत स्वच्छतेसाठी असलेल्या 5 कोटींमधून शौचालयांची कामे करणार असल्याचे सांगितले. 

तापोळा येथील जलाशयापलीकडे जाण्यासाठी नागरिकांसाठी असणाऱ्या साधनांच्या जादा तरतुदीला वसंत मानकुमरे यांनी विरोध केला. त्यांच्या मुद्‌द्‌याला प्रत्युत्तर देताना राजाभाऊ शेलार यांनी डोंगरदऱ्यातील नागरिकांसाठी जिल्हा परिषद खर्च करणार नसेल, तर आम्ही राज्य शासनाकडून पैसे आणतो, असे सांगताच मानकुमरे व शेलार यांच्यात खडाजंगी झाली. अखेर अध्यक्षांनी मध्यस्थी करत या विषयावर पडदा टाकला. दरम्यान, सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी शेत जमिनीवरील झोन वगळून रहिवाशी झोन करण्यासाठी रेडीरेकनरचा दर ठरवून जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात भर टाकावी, अशी आग्रही मागणी केली. 

बोगस अभियंत्यांची प्रमाणपत्रे सादर 

सदस्य दीपक पवार यांनी बांधकाम विभागात 50 बोगस अभियंते काम करत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांची प्रमाणपत्रे सभागृहात सादर केली. यावर गौडा यांनी संबंधित सुशिक्षित बेरोजगार म्हणून काम करतात का, जिल्हा परिषदेचे कर्मचारी म्हणून काम करतात, याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com