
पोलिसांनी गावातील रस्ते बंद करून कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
कऱ्हाड (जि. सातारा) : शनिवारी आणि रविवारी यात्रा झालेल्या घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे 16 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गाव सील केले असून, गावात संचारबंदी जारी केली आहे. संबंधित बाधित वेगवेगळ्या गल्लीतील असल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहित धरून त्यांच्या संपर्कातील 100 हून अधिक जणांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी आज घारेवाडी गाव सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश जारी केले.
घारेवाडीची शनिवारी आणि रविवारी यात्रा होती. कोरोनामुळे त्यावर निर्बंध होते. मात्र, साध्या पध्दतीने यात्रा झाली. दरम्यानच्या काळात एका ज्येष्ठाला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांच्या घरातील कुटुंबीयांना बाधा झाली. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील काहीजण बाधित झाले. त्यानंतर संख्या वाढून ती 16 वर गेली आहे. संबंधित काहीजण वेगवेगळ्या गल्लीतील आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याचा विचार करून प्रांताधिकारी दिघे यांनी काल सकाळी घारेवाडी गावातील दैनंदिन व्यवहार बंद करून गाव सात दिवसांसाठी सील करण्याचे आदेश काढले आहेत.
फलटणात खून, दरोडा, घरफोडीतील नऊ गुन्हे उघडकीस; तालुक्यातील चारजण पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, प्रांताधिकारी दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता साळुंखे, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी संबंधित गवात भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गावातील रस्ते बंद करून कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, संबंधित बाधितांच्या संपर्कातील 100 हून अधिक जणांचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता थोरात यांनी आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी सर्व्हेही सुरू करण्यात आला आहे. दरम्यान शहरातील शनिवार पेठ व तालुक्यातील येरवळे, उंब्रज, कोरेगाव येथील प्रत्येक एक तर विद्यानगरमधील दोन कोरोनाबाधित सापडले आहेत.
राष्ट्रवादीची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येक गावात युवकांची फळी निर्माण करणार
इंदोलीत लग्नातून चार जणांना बाधा
इंदोली येथील लग्नासाठी कोरेगाव तालुक्यातून एकजण आला होता. त्याला लग्नादरम्यानच कोरोनासदृश त्रास होऊ लागला. त्याची माहिती मिळाल्यावर संबंधिताची इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संबंधितांच्या संपर्कातील 50 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आणखी तिघे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांच्या संपर्कातील आणखी काहीजणांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे इंदोलीतील लग्नातील वऱ्हाडी मंडळी सध्या चिंतेत आहेत. दरम्यान ज्यांना त्रास होत असेल, त्यांनी तपासणीसाठी स्वतःहून पुढे यावे, त्यामुळे इतरांना त्याचा त्रास होणार नाही, असे आवाहन कऱ्हाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे