सेवारस्त्यावर कचरा, दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य; शिवडेतील हॉटेल व्यावसायिकांकडून बेजबाबदार कृत्य

संतोष चव्हाण
Tuesday, 26 January 2021

गेल्या अनेक वर्षांपासून येथील हॉटेल व्यावसायिक आपल्या हॉटेलमधील कचरा उघड्यावर टाकत आहेत. यामुळे येथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

उंब्रज (जि. सातारा) : शिवडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांकडून महामार्गालगतच्या सेवारस्त्यांवर उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधी व घाणीमुळे येथील ये-जा करणाऱ्या नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. महामार्ग देखभाल-दुरुस्ती विभागाने याकडे कानाडोळा केला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे गावच्या हद्दीत सेवारस्त्यालगत हॉटेल व्यावसायिक शिल्लक राहिलेले अन्न व कचरा सेवारस्त्यालगत असणाऱ्या नाल्यांमध्ये टाकून देत आहेत. यामुळे येथील सेवारस्त्यांना कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील हॉटेल व्यावसायिक आपल्या हॉटेलमधील कचरा उघड्यावर टाकत आहेत. यामुळे येथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे. उघड्यावर पडलेल्या शिल्लक अन्न व कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारताना दिसतात. दररोज सकाळ व संध्याकाळ व्यायाम करायला जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी व मोकाट जनावरांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

शिवेंद्रसिंहराजेंचा डाव राष्ट्रवादीसाठीही ठरणार फायदाचा?

हॉटेल व्यावसायिक महामार्गालगत नियमित कचरा टाकतात. परंतु, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. यामुळे कचरा उघड्यावर टाकण्याचे प्रमाण आणखी वाढले आहे. गेली अनेक वर्षे न सुटलेल्या कचऱ्यापासून पसरणाऱ्या दुर्गंधीपासून कधी मुक्ती मिळणार, असा प्रश्न नागरिकांच्यातून विचारला जात आहे. महामार्ग देखभाल-दुरुस्ती विभाग याकडे कधी लक्ष घालणार, असा संतप्त सवाल नागरिकांच्यातून केला जात आहे. ही समस्या अजून किती वर्षे सोसावी लागणार, असा प्रश्न नागरिकांतून नेहमी विचारला जात आहे. 

जलसिंचनचा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर; कोयनेत विजेचाही लपंडाव

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News The Health Of The Citizens Of Umbraj Is Endangered Due To Garbage