राज्यात कोरोनाचा कहर, गावच्या सर्व सीमा बंद; मेढ्यात यात्रा रद्द करण्याचा निर्णय

विजय सपकाळ
Wednesday, 17 February 2021

कोरोनाच्या पार्शभूमीवर सर्व उपाययोजना नियमांचे पालन करून येत्या 26 फेब्रुवारी रोजी ध्वज काठी उभारून साध्या पद्धतीने मोजक्‍या ग्रामस्थांमध्ये यात्रा प्रारंभ होणार आहे.

मेढा (जि. सातारा) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कुसुंबीची ग्रामदैवता काळेश्वरीची यात्रा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय झाला. आज तहसील कार्यालयात प्रशासन, श्री काळेश्वरी विश्वस्त मंडळ व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे साध्या आणि पारंपरिक पद्धतीने श्री काळेश्वरीची विधिवत पूजा करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्शभूमीवर सर्व उपाययोजना नियमांचे पालन करून येत्या 26 फेब्रुवारी रोजी ध्वज काठी उभारून साध्या पद्धतीने मोजक्‍या ग्रामस्थांमध्ये यात्रा प्रारंभ होणार आहे. ता. 28 फेबुवारी रोजी रुद्राभिषेक सकाळी सात वाजता होणार असून, मार्च महिन्यातील एक मार्च व दोन मार्च रोजी देवीची मुख्य यात्रा आहे. दरम्यान, यात्रा काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. मात्र, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेश व निर्देशानुसार यात्रेतील धार्मिक विधी पूजाअर्चा रूढी परंपरेनुसार देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी, ग्रामस्थ अशा मोजक्‍याच भाविकांनी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सोपान टोणपे यांनी दिल्या आहेत. यात्रा काळात 144 कलम लागू करण्यात येणार असून, गावाच्या सर्व सीमा बंद केल्या जाणार आहेत. यात्रा काळात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन देवस्थान ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे. 

उंब्रज परिसरात वाळू चोरट्यांचा धुमाकूळ; दहशत निर्माण करत माफियांचा राजरोस उपसा

काळूबाईच्या यात्रेच्या नियोजनासाठी तहसीलदार कार्यालयात आज प्रांतधिकारी सोपान टोणपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीसाठी तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने, कुसुंबीच्या सरपंच पुष्पा चिकणे, श्री काळेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष रामदास वेंदे, विजय वेंदे, बाजीराव चिकणे, जगन्नाथ चिकणे, तुकाराम चिकणे, ज्ञानेश्वर चिकणे, तलाठी साळुंखे, आरोग्य अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी, तसेच काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

पहिल्याच प्रयत्नात CA परीक्षेत नेहा, प्रतीक्षाची दमदार कामगिरी; राज्यात उंचावले साताऱ्याचे नाव

कोरोनामुळे तीर्थक्षेत्र कुसुंबी येथील यात्रा रद्द करण्यात आली असून, याची भाविकांनी नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. 
-राजेंद्र पोळ, तहसीलदार जावळी 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Kaleshwari Festival At Kusumbi Canceled