esakal | कऱ्हाड-मसूर मार्गावर धोका वाढला; कोपर्डे हवेलीत रस्ता खचल्याने अपघाताची शक्‍यता!

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

गेल्या दोन वर्षांत चार ते पाच वाहनांचे याच ठिकाणी अपघात झाले आहेत.

कऱ्हाड-मसूर मार्गावर धोका वाढला; कोपर्डे हवेलीत रस्ता खचल्याने अपघाताची शक्‍यता!
sakal_logo
By
जयंत पाटील

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : कऱ्हाड-मसूर रस्त्यावरील कोपर्डे हवेलीच्या हद्दीतील शिदोबाच्या पुलानजीकचा रस्ता पाच ते सहा फुटाने खचला आहे, तर पुलाचे संरक्षण कठडे तुटल्याने तो धोकादायक बनला असून, गेल्या दोन वर्षांत चार ते पाच अपघात या ठिकाणी झाले आहेत. 

कऱ्हाड-मसूर रस्त्यावर कायमच वाहनांची वर्दळ असते. कोपर्डे हवेलीच्या उत्तर बाजूस सुमारे दीड किलोमीटरवर सिद्धोबाचा पूल आहे. शिवारात जाण्यासाठी कऱ्हाड- मसूर रस्त्याला सिद्धनाथ ओढ्याला तीव्र उतार आहे. या ठिकाणी दोन ओढे आहेत. त्या ठिकाणी हा पूल बांधला आहे. पुलानजीक पाच ते सहा फूट रस्त्याच्या साइडपट्टी खचली आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. त्या ठिकाणी धोकादायक वळण असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. शिवाय याठिकाणी असलेल्या वळणावर वाहनचालकाचा ताबा सुटतो. 

गेल्या दोन वर्षांत चार ते पाच वाहनांचे याच ठिकाणी अपघात झाले आहेत. अपघाती वळण, खचलेला रस्ता आणि पुलाचे तुटलेले संरक्षण कठडे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. गेल्या वर्षी कच्च्या साखरेच्या ट्रकला अपघात झाला होता. संरक्षण कठडा तुटल्यामुळे खूप वेळा वाहनचालकांना अंदाज न आल्याने या ठिकाणी छोटे- मोठे अपघात होत असतात. त्यातच आता कारखाना सुरू आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या व ट्रॅक्‍टर याच रस्त्याने जात असल्याने वर्दळ आणखीनच वाढली आहे. शिवारातील लोकांना देखील ये- जा करताना जिवाला धोक निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून संरक्षण कठडा व रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

खुशखबर! आमदारांना वाढीव एक कोटीची लॉटरी; साताऱ्यातील दहा जणांना मिळणार बंपर 30 कोटी

शिदोबाचा पूल धोकादायक बनला आहे. कऱ्हाड- मसूर रस्त्यावरील पुलानजीकचा भाग खचल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यातच आता कारखाना सुरू झाला असल्याने ऊस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित विभागाने पुलाचे संरक्षण कठडे व खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी.

-भरत चव्हाण, कोपर्डे हवेली-शेतकरी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे