
भुईंज (जि. सातारा) : शेतकऱ्यांना बांधावर ऊस बियाणे पोच केलेल्या योजनेवर आक्षेप घेत विरोधकांनी किसन वीर कारखान्याच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर न्यायालयात 45 खटले दाखल केले होते. यातील शेवटच्या खटल्याचा निकाल काल (शुक्रवारी) मेढा न्यायालयाने देऊन सर्वांना निर्दोष ठरविले. कारखान्यावर दाखल सर्वच्या सर्व 45 खटल्यांतून "किसन वीर'ची निर्दोष मुक्तता झाली आहे.
किसन वीर कारखान्याच्या विरोधातील या शेवटच्या खटल्याची सुनावणी मेढा न्यायालयात होऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एम. काळे यांनी हा निकाल दिला. विरोधकांनी भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर 45 खटले दाखल केले होते. कार्यक्षेत्रात पुरेशा उसाची उपलब्धता होण्यासाठी 2004 मध्ये शेतकऱ्यांना बांधावर ऊस बियाणे देण्याची योजना बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने राबविली होती. या प्रकरणात कवठे (ता. वाई) येथील राहुल मधुकर डेरे यांनी मेढा पोलिस ठाण्यात कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट कागदपत्र तयार करून 8750 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दिली होती. मेढा न्यायालयात त्याची सुनावणी होऊन या खटल्यातून या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
2004-05 या वर्षात कारखान्यात कमी गळीत झाले होते. त्यामुळे कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता व्हावी, यासाठी बॅंकेच्या सहकार्याने कारखान्याच्या वतीने योजना राबविली. या योजनेचा लाभ 2725 शेतकऱ्यांनी घेत 1608.91 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली. विरोधकांनी राजकारणातून संस्थेला वेठीस धरत 45 जणांना पुढे करीत वाई न्यायालयात 37, सातारा न्यायालयात दोन, मेढा न्यायालयात सहा खटले दाखल केले होते. त्या सर्वच्या सर्व खटल्यांतून कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर व इतरांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याचे कारखान्याचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने ऍड. ताहिर मणेर, ऍड. दिनेश धुमाळ, ऍड. साहेबराव जाधव, ऍड. विद्या धुमाळ, ऍड. भारती कोरवार, तसेच बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने ऍड. सुरेश खामकर यांनी कामकाज पाहिले.
किसन वीर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांबाबत खटले दाखल केले गेले. संस्था कशी बंद पडेल असाच प्रयत्न तक्रारदारांच्या बोलवत्या धन्यांनी वारंवार केला. न्यायदेवतेने न्याय केला. नियतीही न्याय करेल.
- मदन भोसले, अध्यक्ष (किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, भुईंज)
शेतकऱ्यांसाठी योजना राबविली म्हणून न्यायालयात खेचले. त्यासाठी जिल्हा बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला. याच प्रकरणात नाही तर प्रत्येक ठिकाणी अडचणी निर्माण करण्यासाठी किती कुलंगड्या केल्या याची गणती करणं अवघड झाले आहे. स्वत:च्या जळफळाटापोटी संस्थेशी खेळ करू नका.
- गजानन बाबर, उपाध्यक्ष (किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना)
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.