'कराड जनता'त अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती भोवली; सुमारे 300 कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर

'कराड जनता'त अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती भोवली; सुमारे 300 कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : कराड जनता सहकारी बॅंकेत कर्माचाऱ्यांचे मोठे हाल झाले. 1992 ते 1997 कालवधीत बॅंकेत गरज नसताना कर्मचाऱ्यांची अतिरिक्त भरती झाली. भरतीवेळी त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले. सेवक कल्याण निधीचा पैसा "बझार'कडे वळवला. त्यातून वाद झाल्याने बॅंकेच्या संचालक मंडळात फूट पडली. काही जण राजीनामा देऊन बाहेर पडले. सेवकांची गृहनिर्माण सोसायटी निर्माण करणाऱ्यांनाही दूर ठेवण्यात आले. तोही पैसा स्वहितासाठी वापरला. कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्जे काढण्यात आली. ती आजही कर्जे जिवंत आहेत. नोकरीची सिक्‍युरिटी देण्याच्या नावाखाली तत्कालीन संचालकांनी केलेला गैरकारभार सहकार खात्यासह रिझर्व्ह बॅंकेकडून ताशेऱ्यावर आला. न्याय मिळावा, यासाठी अखेर कर्मचाऱ्यांनाही पोलिस अन्‌ न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. कराड जनता बॅंकेभोवती 1987 पासून सुरू झालेल्या आर्थिक, राजकीय चक्रव्यूहाचे वलय आठ डिसेंबर रोजी परवाना रद्द झाला त्याच दिवशी थांबले. त्यामुळे शेकडे ठेवीदारांसह तब्बल 300 कर्मचाऱ्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. 

बॅंकेच्या वाटचालीत कर्मचारी भरतीचा टप्पा अत्यंत घातक ठरला. शिक्षण न पाहता झालेली भरती कराड जनता बॅंकेच्या मुळावर आली. सेवक झालेल्यांकडूनच पैसा उकळणारे संचालकही त्या काळात अस्तित्वात आल्याने बॅंकेत नको तितक्‍या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे बॅंक म्हणजे राजकीय अड्डा झाली. तेथे दक्षिण मतदारसंघाची हवा फिरली. त्यातून विधानसभा निवडणुकांचे फड रंगत गेले. त्यामुळे त्या काळात बॅंकेच्या कारभाराचा आलेख कागदावर वाढत असला, तरी प्रत्यक्षात तो घसरत होता. बॅंकेच्या कामाकाजात ढिलाई आली होती. व्यवहारात नको इतकी अनियमितात आली. रिझर्व्ह बॅंकेची पत्रे येऊ लागली. परिणामी अखेर 1998 मध्ये पहिली "मनी लॉंड्रिंग'ची तक्रार संचालकांवर झाली. एका खात्यातून शेकडो रुपये परस्पर काढल्याची तक्रार झाली. व्यक्तिगत फर्मच्या नावावरील खात्यातून काढलेल्या पैशाच्या विरोधात रीतसर तक्रार झाली होती. त्याचे काय झाले, ते अद्यापही समजू शकले नाही. त्यापूर्वीही 1985 मध्येही एका खात्यातून अशी रक्कम काढली गेली. त्याविरोधात तक्रार न होता प्रत्यक्षात कार्यवाही झाली. त्यानंतर 1987 पासून अनेक गोष्टी बॅंकेत घडत गेल्याने त्याचे परिणाम अनेक अर्थाने झाले. कर्मचाऱ्यांची अतिरिक्त भरती झाली. तीही तक्रार मॅनेज केली गेली. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची गृहनिर्माण सोसायटी काढण्याचा प्रयत्न केला. त्याही प्रयत्नाला तत्कालीन अध्यक्षांसह संचालक मंडळांनी खो घातला. गृहनिर्माण सोसायटीसाठी प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांना बाजूला ठेवण्यात आले. 

कराड जनता सहकारी बॅंकेच्या संचालकांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्जे काढली आहेत. ती आजही जिवंत आहेत. त्याची रक्कम चार कोटी 62 लाख 87 हजार इतकी आहे. त्या विरोधामध्ये कर्मचारी न्यायालयात, पोलिस ठाण्यात गेले आहेत. मात्र, कर्माचाऱ्यांच्या नावावरी कर्जे काढून ती बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांच्या मित्रांच्या कर्ज खात्यात भरल्याचा आरोप होतो आहे. त्याचा तपास होण्याची गरज आहे. त्याची सखोल चौकशी करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. तत्कालीन संचालक मंडळासह बॅंकेचे अधिकारीही त्या कटात सहभागी आहेत, असा कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. तो कितपत खरा आहे, यापेक्षा कर्माचाऱ्यांनी राजेश पाटील-वाठारकर यांचे निकटचे मित्र बाजीराव शामराव पाटील, अरुण सदाशिव पाटील व भाऊसाहेब बाबूराव थोरात या तिघांच्या बोगस कर्जाच्या खात्यात कर्मचाऱ्यांच्या नावाने काढलेली रक्कम अनुक्रमे दोन कोटी 32 लाख 52 हजार, एक कोटी नऊ लाख 96 हजार, तर एक कोटी 14 लाख 24 हजार असा तपशीलही दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा छडा लावण्याची गरज आहे. बॅंक दिवाळखोरीत निघाल्याने आधीच रस्त्यावर आलेल्या बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यावर कर्जाचाही डोंगर आल्याने ते आता सैरभैर झाले आहेत. 

सामुदायिक राजीनाम्याच्या पहिला हादऱ्यानंतरही... 

कराड जनता बॅंकेतील सेवकांच्या कल्याण निधीवरूनही वाद झाला. 1995-96 मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचा दीड पगार सेवक कल्याण निधीला वर्ग केला. त्या काळामध्ये ती रक्कम दहा लाखांच्या आसापास होती. त्यातून सेवकांचे कल्याण तर काही झाले किंवा केले नाहीच. "जनता बझारला'मात्र तो पैसा वळविण्यात आला. तत्कालीन अध्यक्षांनी तो निर्णय रेटून घेतला. त्यामुळे संचालक मंडळांतच थेट फूट पडली. त्यासह सगळ्याच कारभाराला कंटाळून तत्कालीन उपाध्यक्षांसह काही संचालक, अधिकारी, कर्मचारी अशा जवळपास 21 जणांनी एकाच वेळी सामुदायिक राजीनामे दिले. सामुदायिक राजीनामे सहकार क्षेत्रालाच त्यावेळी धक्कादायक बाब होती. तसा तो कराड जनता बॅंकेला पहिला हादरा होता. मात्र, त्यातूनही सावध न होता. तसाच बिनबोभाट कारभार सुरूच होता. त्या कारभारामुळे बॅंक दिवाळखोरीत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com