महाबळेश्वरपाठोपाठ कोयनाही होणार पर्यटनाचे डेस्टिनेशन; गृहराज्यमंत्र्यांचा पुढाकार

सचिन शिंदे
Monday, 25 January 2021

धार्मिक पर्यटक हे कोयनेच्या निसर्ग पर्यटनाकडे वळवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोयना पर्यटन विकसित केले जाणार आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : पर्यटनाबाबत सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हे एकमेकांवर अवलंबून आहेत. कोल्हापूर, सांगलीला धार्मिक, तर सातारला निसर्गपर्यटनाचा वारसा आहे. आता धार्मिक पर्यटक हे कोयनेच्या निसर्ग पर्यटनाकडे वळवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोयना पर्यटन विकसित केले जाणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी प्राथमिक आराखडा तयार करून कामेही सुरू केली आहेत. त्यामुळे महाबळेश्वरपाठोपाठ सातारा जिल्ह्यात कोयनाही पर्यटनाचे डेस्टिनेशन होणार आहे. 

कोल्हापूरच्या अंबाबाईसह पन्हाळा, जोतिबा, दाजीपूर अभयारण्य भटकंतीला, तसेच सांगलीला धार्मिक पर्यटनाला आलेले पर्यटक कोयनेकडे आलेच पाहिजेत, त्यादृष्टीने कोयना पर्यटनाची आखणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील महाबळेश्वर, तापोळा, वासोटासारख्या पर्यटनस्थळांची जोडही कोयना पर्यटनास दिली जाणार आहे. गृहराज्यमंत्री देसाई यांनी पुढाकार घेत पर्यटन आराखड्यातील कामे पर्यटन विकास महामंडळाकडून मंजूर केली आहेत. प्रलंबित निधीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे कोयना टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषाने दुमदुमला मालवणचा किनारा  

कोयना धरणात टुरिस्ट बोटिंग होणार आहे. नेहरू गार्डनचे पर्यटन व कोयना धरण व्यवस्थापनावर त्याची जबाबदारी आहे. कोयनेलगतच्या बोपोलीतील पांडवकालीन अंबाखेळती मंदिराचा विकास क्षेत्र महाबळेश्वर येथील मंदिराच्या धरतीवर केला जाणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवे बांधकाम न करता तेथील 25 किलोमीटरच्या पायवाटा जांभा दगडामध्ये विकसित करून ट्रेकिंग रुट होणार आहे. घाटमाथ्यावरून कोकणचा भाग दिसणारा पाइंट "कोकण दर्शन पॉइंट' म्हणून विकसित होईल. ओझर्डे धबधबा परिसरही विकसित केला जाणार आहे. पोलिस प्रशिक्षण उपकेंद्रही कोयनानगरात होणार असल्याने तेथे राबता वाढून पर्यटन वाढणार आहे.

कडक सॅल्यूट! कोरेगावच्या जांबाज पोलिस अधिकाऱ्याचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

कोयना पर्यटनात याचा असेल समावेश 

  • कोयना धरणाच्या सुरक्षितता भिंतीपासून पश्‍चिमेला सात किलोमीटरपुढे टुरिस्ट बोटिंगला मिळणार परवानगी 
  • पर्यटन विभाग आणि कोयना धरण व्यवस्थापनावर संयुक्तपणे नेहरू गार्डनची जबाबदारी 
  • कोयनानगरला पोलिस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी हिरवा कंदील 
  • बोपोलीच्या अंबाखेळती पांडवकालीन मंदिर परिसराला मिळणार पर्यटनाचा दर्जा 
  • क्षेत्र महाबळेश्वरच्या मंदिराच्या धरतीवर अंबाखेळतीचाही होणार विकास 
  • जंगलातील पायवाटा जांभा दगडामध्ये विकसित करून ट्रेकिंग रुट होणार विकसित 
  • कोयनेलगतच्या घाटमाथ्यावरील कोकण दर्शनचा परिसरही कोकण दर्शन पॉइंट म्हणून करणार विकसित 

माजी मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेला सोशल मीडियावर जोरदार दाद

व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती गृहित धरूनच कोयना पर्यटनाचा आराखडा आखला जातो आहे. तो आराखडा चांदोली राष्ट्रीय अभयारण्य, कोल्हापूरच्या राधानगरी, सागरेश्वरचा परिसरालाही फायद्याचा ठरणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व कोकणच्या रत्नागिरीचा काही भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येतो. त्यामुळे त्या सीमावर्ती भागाचा विकासात कोयना पर्यटन डेस्टिनेशन ठरेल. त्यामुळे कोयनेत पर्यटनाच्या विकासास विशेष महत्त्व आले आहे. येणारा पर्यटक तिन्ही जिल्ह्यांत जाईल, याची काळजी घेण्यात येत आहे. 
-शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Minister Shambhuraj Desai Initiative For Koyna Tourism