
विसापूर (जि. सातारा) : रामोशीवाडी (ता. कोरेगाव) येथील वर्धनगड घाट परिसरात असलेल्या पाझर तलावाची दुरवस्था झाली असून, तो धोकादायक झाला आहे. तसेच गळतीमुळे या तलावात खडखडाट झाला असून, पाण्याअभावी परिसरातील पिके सुकली आहेत. त्यामुळे ओलितासाठी तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगामातील गहू, कांदा, ज्वारी पिकाला पाणी द्यायचे कोठून? असा प्रश्न उभा राहिला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी लघु पाटबंधारे विभागाने या पाझर तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
वर्धनगड घाट परिसरातील रामोशीवाडी हद्दीत 1972 मध्ये बांधलेल्या या पाझर तलावाची एक-दोन वेळची किरकोळ डागडुजी वगळता दुरुस्ती झालेली नाही. पाझर तलावाच्या संरक्षक भिंतीवर झाडी वाढली आहे. झाडांची मुळे खोलवर जाऊन भिंतीचे दगड व खालील माती निसटत आहे. त्यामुळे या तलावाला काही ठिकाणी मोठी गळती लागली आहे. परिणामी, या तलावाची पाणी साठवण क्षमता मोठी असली, दरवर्षी नेमकी ज्यावेळी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असते, त्याच वेळी हा तलाव कोरडा पडत असल्याने डिसेंबर महिन्यापासूनच येथील शेतकऱ्यांसमोर शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहतो. शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी संबंधित विभागाने तलाव्यावरील बंधारा ताबडतोब दुरुस्त करून या बंधाऱ्यातून होणारी पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी रामोशीवाडी येथील ग्रामस्थ तसेच तलाव परिसरातील शेतकरी करत आहेत.
आगामी काळात जिहे-कटापूरचे पाणी उपसा जलसिंचन योजनेद्वारे नेर धरणात सोडण्यात येणार आहे. या योजनेचा तिसरा टप्पा या तलावाशेजारी असून, हे पाणी या तलावात सोडण्याचीदेखील तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या तलावाची पाणी गळती थांबविल्यास भविष्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली तरी डोंगराशेजारी वसलेल्या वाड्यावस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच परिसरातील शेतीचा प्रश्न कायमचा सुटू शकतो.
-अजय मदने, ग्रामस्थ, रामोशीवाडी
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.