
वर्णेत जवान सचिन काळंगे यांच्या स्मरणार्थ धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते.
अंगापूर (जि. सातारा) : वर्णे (ता. सातारा) येथील भारतीय सैन्य दलातील आजी- माजी जवानांनी स्थापन केलेल्या भारतीय सेना ग्रुपने नुकतेच दिवंगत झालेले जवान सचिन काळंगे यांच्या स्मरणार्थ धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील 195 मुले, तर 55 मुलींनी सहभाग घेतला होता.
ही स्पर्धा मुलींसाठी 800 मीटर, तर मुलांसाठी 1600 मीटर मुले अशा दोन गटांत पार पडली. मुलींच्या गटात वैष्णवी मोरे (कऱ्हाड) हिने प्रथम, तर धनश्री माने (मांडवे) व गौरी खिलारे (सोलापूर) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला, तसेच मुलांमध्ये श्रीधर सावंत (येतगाव, कडेगाव) याने प्रथम, तर विकास पोळ (फलटण) याने द्वितीय व राहुल जाधव (अंबवडे खुर्द) याने तृतीय क्रमांक मिळविला.
हे पण वाचा- राजधानीत शिवजयंतीची उत्सुकता शिगेला; पुतळे, भगव्या झेंड्यांनी सजला सातारा!
स्पर्धेचे उद्घाटन दिवंगत जवानाच्या पत्नी अश्विनी सचिन काळंगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना (कै.) सुभेदार चंद्रकांत शंकर काळंगे यांच्या स्मरणार्थ चषक देण्यात आले. या वेळी गावातील अनुष्का दत्तात्रय कुंभार हिने राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ऑनररी कॅप्टन विकास पवार, सेना जवान वैभव पवार, समाधान काळंगे, पुरुषोत्तम कुंभार, गणेश सपकाळ, योगेश पवार, जितेंद्र पवार, अजित काळंगे, अनिकेत काळंगे, सचिन काळंगे, राहुल काळंगे आदींनी परिश्रम घेतले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे