पालकांच्या मागणीचा विचार न झाल्यास शाळेला टाळे ठोकू; कोपर्डे हवेलीत पोदार स्कूलसमोर निदर्शने

जयंत पाटील
Saturday, 23 January 2021

पोदार स्कूलने लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अन्यथा आम्ही तुमच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात धडक मोर्चा काढू, असा इशारा वैशाली जाधव यांनी दिला आहे.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा ऑनलाइन वर्ग सुरू असताना 100 टक्के फी आकारली जात आहे. ऑनलाइन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन ग्रुपमधून रिमूव्ह केले आहे. याविरोधात पालकांनी निवेदनाद्वारे निदर्शने करत 50 टक्के फी माफ करावी व रिमूव्ह केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण प्रणालीत पुन्हा सामावून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन प्राचार्य अन्वय चिकाटे यांना दिले. 

या वेळी कैलास पाटील, धनंजय जाधव, गणेश चव्हाण, बी. एम. गायकवाड, वैशाली जाधव, राणी शेंडगे, माधुरी पवार, सचिन सूर्यवंशी, दादासाहेब चव्हाण, मोहन चव्हाण, पोपट चव्हाण, शरद चव्हाण, नारायण चव्हाण, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष पराग रामुगडेसह पालक उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजता सर्व पालक जमा झाले. त्या वेळी शाळेतून सुमारे दीड तास प्राचार्य अन्वय चिकाटे बाहेर येत नसल्याने तणाव वाढला. पोदार स्कूल हाय हायच्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी कैलास पाटील म्हणाले, "शाळेचा कॅंपस कोणतीही फॅसिलिटी वापरत नसताना आम्ही 100 टक्के फी भरणार नाही. 50 टक्के फी भरण्यासाठी सर्व पालक तयार आहोत. ऑनलाइन शिक्षण प्रणालीतून फी भरली नाही म्हणून काढण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा सामावून घ्यावे.''

निवडणुकीसाठी 100 कोटी खर्च करू, तुम्हाला मंत्रीपद देऊ; भाजपची राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला ऑफर

पराग रामुगडे यांनी या आंदोलनास पाठिंबा असल्याचे पत्र दिले. भविष्यात पालकांच्या मागणींचा विचार न झाल्यास शाळेला टाळे ठोकले जातील, असा इशारा त्यांनी दिला. वैशाली जाधव म्हणाल्या, ""पोदार स्कूलने लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अन्यथा आम्ही तुमच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात धडक मोर्चा काढू.'' दरम्यान, आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्राचार्य तयार नसल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले. शेवटी कऱ्हाड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी मध्यस्थी केल्याने प्राचार्य अन्वय चिकाटे यांनी निवेदन स्वीकारले. 

जागतिक हस्ताक्षर दिन विशेष! हस्ताक्षराची गोडी, जगाशी नाते जोडी..

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Parents Protest Against School Management In Front Of Podar School At Koparde Haveli