पिंगळीत स्थानिक नेतृत्वाचा लागणार कस; नऊ जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News

दहिवडी (जि. सातारा) : सातारा-पंढरपूर व दहिवडी-वडूज रस्त्यावरील अतिशय मोक्‍याचे ठिकाण असणाऱ्या पिंगळी बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक ही नेतृत्वाचा कस पाहणारी आहे. श्रीकांत जगदाळे यांच्याविरोधात धर्मराज जगदाळे, हिम्मतराव जगदाळे, वसंत सजगणे, दीपक सजगणे, चिमणराव यादव हे एकवटले असून निवडणूक अटीतटीची होण्याची शक्‍यता आहे. दोन जागा बिनविरोध जिंकून श्रीकांत जगदाळे यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आहे.
 
पिंगळी बुद्रुक हे मुख्य रस्त्यावरील चौक असणारे मोठे गाव. साधारण तीन हजारांच्या आसपास मतदान या गावाचे असून पंचायत समिती गणाचे हे गाव आहे. ग्रामपंचायतीसाठी चार प्रभागांतून 11 सदस्य निवडले जातात. (कै.) पतंगराव जगदाळे यांची या गावावर अनेक वर्षे एकहाती सत्ता होती. सध्या या गावच्या कविता जगदाळे या माण पंचायत समितीच्या सभापती आहेत, तर यापूर्वी धर्मराज जगदाळेंच्या पत्नी उर्मिला जगदाळे यांनी सभापतिपद भूषविले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शेखर गोरे यांच्या पाच, रणजितसिंह देशमुख यांच्या चार, तर श्रीकांत जगदाळे यांच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. देशमुख गटाच्या जिजाबाई जाधव या साडेतीन वर्षे, तर गोरे गटाचे वसंत सजगणे हे दीड वर्ष सरपंच होते. 

यावर्षी 11 सदस्यांपैकी प्रभाग क्रमांक चारमधील दोन सदस्य बिनविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित नऊ जागांवर लढत होत आहे. नऊ जागांसाठी 19 उमेदवार मैदानात आहेत. वंचित बहुजन आघाडीने प्रभाग क्रमांक एकमध्ये उमेदवार दिला आहे. बारा-तेरा वाड्यावस्त्या मिळून गाव बनले आहे. त्यामुळे विकासापेक्षा वाडीवस्ती सोबतच जात-पात, भावकीवर मतदान अवलंबून राहते. पक्षीयपेक्षा स्थानिक गट-तट कार्यरत झालेत. गाव पातळीवरील सर्वच नेते मंडळी निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्याने निवडणूक चुरशीची व अटीतटीची बनली आहे. 

गावच्या विकासाची मतदारांची अपेक्षा 
पिंगळी बुद्रुक हे चौकातील मुख्य गाव असूनही या गावाची म्हणावी अशी ओळख बनलेली नाही. गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. चौकातील गाव असल्याचा फायदा घेऊन तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा मतदार करताना दिसून येत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com