
युती सरकारच्या कालखंडात राज्यात झुणका भाकर केंद्रे सुरू करण्यात आली.
मल्हारपेठ (जि. सातारा) : येथील महसूल विभागाच्या जागेवरील बहुचर्चित झुणका भाकर केंद्राच्या वादग्रस्त अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा पडला. तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्यासह पोलिस बंदोबस्तात हे बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यात आले. तत्कालीन झुणका भाकर केंद्र चालकाने अतिक्रमण केल्याचे कारणावरून ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
युती सरकारच्या कालखंडात राज्यात झुणका भाकर केंद्रे सुरू करण्यात आली. काही वर्षांनंतर ही केंद्रे बंद पडली. त्यानंतर बंद असलेल्या बहुतेक झुणका भाकर केंद्रांत काही चालकांनी हॉटेल व इतर व्यवसाय सुरू केले. जिल्हा पुरवठा विभागाने अशा झुणका भाकर केंद्रचालकांना रितसर नोटीस काढून ती ताबडतोब खाली करण्यास सांगण्यात आले. एक-दोन केंद्रचालक वगळता इतरांनी या केंद्राचा शासनाकडे ताबा दिला. मल्हारपेठ येथील झुणका भाकर केंद्राचा ताबा महसूल प्रशासनाला घेता आला नाही.
भुतेघरच्या शेतकऱ्याची सोशल मीडियावर धूम; कन्नड, भोजपुरी, पंजाबी, मराठी, हिंदी भाषांतील हजार गाण्यांना तुफान लाईकस्
या जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा पुरवठा विभागाने शेवटची नोटीस व त्यावरील म्हणणे कळवण्याचा आदेश दिला. त्यावर संबंधित केंद्रचालकाने लेखी म्हणणे कळवून प्रशासनाकडून काही दिवसांचा वेळ मागितला. मात्र, महसूल प्रशासनाने आज सकाळी साडेदहा वाजता तहसीलदार टोंपे, मंडलाधिकारी काळे, तलाठी सदानंद साठे यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात हे बेकायदेशीर अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे