जिल्ह्यात 800 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची मोहीम

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस दल ऍक्‍टिव्ह झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक उपविभागीय कार्यालयामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करून प्रतिबंधात्मक कारवायांची मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत सुमारे 800 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यापासून लॉकडाउन जाहीर झाले. त्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होता, तो नागरिकांची गर्दी टाळण्याचा. त्यातून संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. त्याचाच एक भाग म्हणून या कालावधीत होणाऱ्या सर्वच प्रकारच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी व्हायला लागल्यावर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले. त्याचप्रमाणे रखडलेल्या एकएका निवडणुकांना हिरवा कंदील दाखविण्यास सुरवात झाली. त्यानुसार काही दिवसांपूर्वी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुका झाल्या. आता ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. 

जिल्ह्यातील तब्बल 879 निवडणुकांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यानुसार अर्ज भरणे, अर्ज छाननी व अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली आहे. आता प्रचाराचा धुरळा गावोगावी उडू लागला आहे. कोणत्याही निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत निवडणुका या अधिक अटीतटीच्या व संवेदनशील असतात. त्यामुळे या कालावधीतील गावोगावी वादाचे प्रसंग निर्माण होतात. त्यातून अनेकदा वाद विकोपाला गेल्याचे तसेच खुनाचा प्रयत्न, खून अशा प्रकारचे गंभीर गुन्हेही आजवर घडले आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिस दलाची असते. त्यामुळे गावोगावी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे काम पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सुरू केले. 

त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकारी असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांना जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस उपविभागनिहाय शिबिराचे आयोजन करून प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रत्येक उपविभागनिहाय शिबिराचे आयोजन करून सीआरपीसीतील 110 व 107 कलमानुसार आत्तापर्यंत 648 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. फलटण उपविभागात 220, वडूज उपविभागात 198, पाटण उपविभागात 85, कऱ्हाड उपविभागात 211 तर, वाई उपविभागात 134 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरेगाव उपविभागामध्ये 181 जणांवर कारवाई करण्यात आली आहे तर, सातारा उपविभागामध्ये आत्तापर्यंत 90 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवायांमुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शांतता राखण्यात मदत होणार आहे. 

उपविभागनिहाय केलेल्या कारवाया... 

  • फलटण उपविभाग- 220 
  • वडूज उपविभाग- 198 
  • पाटण उपविभाग- 85 
  • कऱ्हाड उपविभाग- 211 
  • वाई उपविभाग- 134 
  • कोरेगाव उपविभाग- 181 
  • सातारा उपविभाग- 90 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com