शिखर शिंगणापुरात चौरंगी लढत; राजकीय वर्चस्वासाठी मातब्बर उमेदवारांत चुरस

धनंजय कावडे
Tuesday, 12 January 2021

ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात असून, तीन हजार 59 मतदार आहेत. मागील निवडणूक आमदार जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे यांच्या दोन गटांत सरळ झाली होती. त्यामध्ये शेखर गोरे गटाने आमदार गोरे गटाचा दहा विरुद्ध एक असा धुव्वा उडविलेला होता.

शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व अपक्ष अशी जोरदार लढत होत आहे. 11 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तीन पूर्ण व एक अपूर्ण पॅनेल रिंगणात उतरले असून, नेमकी बाजी कोण मारणार? याबाबत उत्सुकता आहे. 

ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात असून, तीन हजार 59 मतदार आहेत. मागील निवडणूक आमदार जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे यांच्या दोन गटांत सरळ झाली होती. त्यामध्ये शेखर गोरे गटाने आमदार गोरे गटाचा दहा विरुद्ध एक असा धुव्वा उडविलेला होता. त्यामुळे राजाराम बोराटे यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. शेखर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विरभद्र कावडे, अभय मेनकुदळे यांच्या नेतृत्वाने सत्ता मिळवली होती. आता नव्याने वॉर्ड रचना झाली असून, हक्काच्या मतांचे विभाजन झाल्याने सत्ताधारी व माजी सरपंच यांना विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. पाच वर्षे कारभार केला; परंतु पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर होण्याची शक्‍यता कमी असून, स्वतःचे स्थानिक राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी ही निवडणूक अटीतटीची होत आहे. 

चोपडी, मुळगावात गृहराज्यमंत्री सत्ता अबाधित राखणार?; राष्ट्रवादीलाही सत्तांतराची संधी

दरम्यान, दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते विस्कळित झाले असून, आपली राजकीय कारकीर्द व घरातील सत्ता टिकवण्यासाठी जातीय समीकरण लावून काही जण या निवडणुकीत उतरले आहेत. सत्ताधारी पॅनेलला सत्तेपासून दूर खेचण्यासाठी पारंपरिक विरोधकांसह वीरभद्र कावडे यांनी गेल्या तीन वर्षांपासून स्वतंत्र नवीन सक्षम गट तयार करून माजी सरपंच राजाराम बोराटे, विद्यमान सरपंच अभय मेनकुदळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. राजाराम बोराटे हे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे खांदे समर्थक आहेत, तर वीरभद्र कावडे, दगडू ठोंबरे हे भाजपचे कार्यकर्ते असूनही स्थानिक गटातटाच्या राजकारणामुळे कावडे यांनी बोराटे यांच्यापासून फारकत घेऊन आपले स्वतंत्र पॅनेल उभे केले, तर गेले अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर राहिलेले ज्येष्ठ नेते दगडू ठोंबरे यांनीही या निवडणुकीत पॅनेल उभे केले असून, संपूर्ण तालुक्‍याचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Shikhar Shingnapur Gram Panchayat Election Are Contested By Four Parties