साताऱ्यातील विकासकामे मार्चअखेर पूर्ण करा; झेडपी अध्यक्षांची अधिकाऱ्यांना सक्त सूचना

गिरीश चव्हाण
Friday, 19 February 2021

सातारा शहरालगतच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने बहुतांश भागात कमी दाबाच्या पट्याने पाणीपुरवठा होत आहे.

सातारा : कोरोनाच्या काळात विकासकामे खोळंबली होती. सध्या कोरोना नियंत्रित आल्याने मंजूर विकासकामे मार्चअखेर पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. याचबरोबर जलजीवन मिशनची कामे तातडीने करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी दिल्या. 

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची विशेष सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच छत्रपती शिवाजी सभागृहात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते व इतर अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला विविध विषयांचा आढावा घेण्यात आला, तसेच मंजूर कामांना लवकरात-लवकर गती देण्याच्या सूचना श्री. कबुले यांनी दिल्या. 

हे पण वाचा- थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन

सातारा शहरालगतच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने बहुतांश भागात कमी दाबाच्या पट्याने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेकदा शहरात एक ते दोन दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सदस्या अर्चना देशमुख यांनी केला. शिवथर या ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार वनिता गोरे यांनी केली. या दोन्ही तक्रारीबाबत लवकरात- लवकर प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

हे ही वाचा- जय शिवराय! सुर्वेंची तिसरी पिढी जपतेय मर्दानी खेळांची परंपरा

पाण्याच्या टंचाईबाबत उपाययोजना 

एप्रिल- मे महिन्यांत जिल्ह्यातील पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास आवश्‍यक उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी तत्काळ आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना श्री. कबुले यांनी केल्या. याचबरोबर जलजीवन मिशनंतर्गत प्रत्येक कुटुंबास जलजीवन मिशनंतर्गत नळ जोडणी करून देत पाण्याचे नियोजन करावे. याचबरोबर ही कामे गतीने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Special Meeting Of Water Management And Sanitation Committee At Satara